Last Update:
 
माझे शहर

राजकीय इच्छाशक्‍तीअभावी खुंटले चिखली कुटीर रुग्णालयाचे आधुनिकीकरण
प्रतिनिधी
Tuesday, December 13, 2011 AT 01:00 AM (IST)
वास्को, ता. 12 ः चिखली कुटीर रुग्णालयाचा विस्तार करणे, त्याचा दर्जा सुधारणे या गोष्टींना मुरगाव, वास्को, कुठ्ठाळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्यांनी आपल्या जाहीरनाम्यात खास स्थान दिले होते. परंतु गेल्या साडेचार वर्षात या रुग्णालयाचा दर्जा वाढला नाही, तसेच त्याठिकाणी नवीन इमारतही उभी राहिली नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात चिखली कुटीर रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला पुन्हा स्थान मिळणार यात शंकाच नाही. खरेतर पुरेशी जागा असूनही, केवळ राजकीय इच्छेअभावी चिखली कुटीर रुग्णालयाचे आधुनिक अशा इस्पितळात रूपांतर होत नाही, हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. 

मुरगाव तालुक्‍यातील मुरगाव, वास्को, दाबोळी व कुठ्ठाळी मतदारसंघातील नागरिक चिखली कुटीर रुग्णालयात उपचारांसाठी येतात. वास्को हे औद्योगिक शहर असल्याने तसेच याठिकाणी एमपीटी, गोवा शिपयार्ड, रेल्वेस्थानक, विमानतळ व इतर केंद्रीय, राज्य व खासगी आस्थापने असल्याने येथे मजूर लोकांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी काही नावाजलेली खासगी इस्पितळे आहेत. परंतु स्वस्त उपचारांसाठी मजूर वर्गातील लोकांना चिखली कुटीर रुग्णालयाचाच आधार घ्यावा लागतो. 

या रुग्णालयात दरदिवशी सुमारे 150 ते 200 रुग्ण भेट देऊन, उपचार घेतात. या रुग्णालयात सध्या तीन डॉक्‍टर आहेत. रुग्णालयात गेल्या काही वर्षात अल्टासाऊंड, एक्‍सरे मशिनची सोय करण्यात आल्याने गरीब रुग्णांची मोठी सोय झाली आहे. तसेच याठिकाणी रक्‍ततपासणी, लॅप्रोस्कोपीकद्वारा नसबंदी करण्यात येते. याठिकाणी एका सामाजिक संस्थेतर्फे एचआयव्ही रुग्णांना समुपदेशनही करण्यात येते. या रुग्णालयाच्या एका भागात ईएमआय-108 चा सुसज्ज असा विभागही आहे. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच चार मृतदेह सामावणारे शवागरही बांधण्यात येत असू, त्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. त्यामुळे वास्कोतील सर्वसामान्य नागरिकांची सोय होणार आहे. 

तथापि या रुग्णालयात काही सर्जनांची पदे रिक्‍त असून, ती भरण्यात आलेली नाहीत. या रुग्णालयात प्रसूती सर्जन होता, त्याची येथून बदली करण्यात आल्यावर त्याठिकाणी नवीन सर्जनाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रसूतीच्याप्रसंगी काही गंभीर प्रसंग ओढावला, तर संबंधित महिलेला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात येते. यामध्ये बराच वेळ जातो. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी व अस्थिरोग तज्ज्ञांची येथे उपलब्धता अधिक गरजेची आहे. 

चिखली कुटीर रुग्णालयाची इमारत सुमारे एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर वसली आहे. चिखली कुटीर रुग्णालयात साठ खाटा आहेत. त्यापैकी पंचवीस खाटांचा उपयोग प्रसूती विभागात करण्यात आलेला आहे, पण तिथेही हा या खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे प्रसूती विभागात येणाऱ्या अधिक महिलांना बऱ्याचवेळा गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातच पाठविण्यात येते. त्यामुळे त्या गरीब महिलांना आर्थिक फटका बसत आहे.
वास्को शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या लोकसंख्येच्या मानाने चिखली कुटीर रुग्णालयातील सुविधा खूपच तोकड्या आहेत. म्हणूनच या रुग्णालयाचे आधुनिक व सुसज्ज इस्पितळात रूपांतर करण्याची अत्यंत गरज आहे. 

विश्‍वजित राणे यांनी आरोग्यमंत्रीपदाचा ताबा घेतल्यावर 9 जून 2007 ला महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्यासमवेत या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी तेथील एकंदर परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली होती. त्याचप्रमाणे चिखली कुटीर रुग्णालयाचा कायापालट करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याठिकाणी 150 खाटांचे इस्पितळ उभारण्याचे आश्‍वासनही दिले होते. पण त्या आश्‍वासनाची अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे वास्कोपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या वाळपईत 150 खाटांचे आधुनिक असे इस्पितळ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 
 
त्याचप्रमाणे चिखली कुटीर रुग्णालयात पुरेशी जागी नसल्याने मुरगाव पालिका इमारतीत हत्तीरोग निर्मूलन विभाग, तसेच लहान मुलांना लस देण्याचा विभाग थाटावा लागला आहे. चिखली रुग्णालयाला सतावणारा मोठा प्रश्‍न म्हणजे रुग्णवाहिका होय. सुमारे दोन लाख किलोमीटर वापरण्यात आलेली रुग्णवाहिका सतत बिघडत असते. वारंवार मागणी करूनही अद्यापही रुग्णवाहिका देण्यात आलेली नाही. 

वास्कोत सुसज्ज व इस्पितळाची गरज असल्याने त्याची उभारणी करण्यात यावी अशी मागणी सतत करण्यात येते. त्यामुळे मध्यंतरी येथील वास्को टुरिस्ट हॉस्टेलचे रूपांतर इस्पितळात करावे व वास्को टुरिस्ट हॉस्टेलची उभारणी बायणा किनाऱ्यावर करण्यात यावी, असा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण बायणा किनाऱ्यावरील त्या मोकळ्या जागेवर रवींद्र भवन प्रकल्प उभारण्यात येत असल्याने तो प्रस्ताव मागे पडला. त्याचप्रमाणे वास्कोचे आमदार फिलिप जुझे डिसोझा यांनी येथील तानिया हॉटेलजवळच्या जागेत इस्पितळ उभारण्याचा प्रस्ताव पुढे केला होता. पण ती जागा दलदलीची असल्याने त्या जागेलाही संबंधितांकडून हरकत घेण्यात आली. उपसभापती मावीन गुदिन्हो व आमदार डिसोझा यांनी चिखली कुटीर रुग्णालयाचे रूपांतर आधुनिक इस्पितळात व्हावे, यासाठी सतत पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश आले नाही.
 
चिखली कुटीर रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास कुवेलकर यांनी मात्र रुग्णालयात गेल्या काही महिन्यांत बराच फरक पडल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी नवीन भुगटार वाहिन्यांची सोय करण्यात आल्याने संडास, बाथरूम स्वच्छ राहू लागले आहेत. भिंतींना रंगसफेदी करण्यात आल्याने रुग्णालयाचा कायापालट झाला आहे. येथे नवीन 11 केव्ही क्षमतेचा जनरेटरची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना होणारी समस्या दूर झाली आहे. डॉक्‍टरांसाठी असणाऱ्या कॉटेजची दुरुस्तीही करण्यात आली आहे, असे डॉ. कुवेलकर यांनी सांगितले. 

एकूणच या सुविधा झाल्या असल्या, तरी वाढत्या लोकसंख्येला या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे इस्पितळाची पूर्णपणे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया
चिखली कुटीर रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्याची गरज आहे. इस्पितळाची नवीन इमारत बांधण्यासाठी पुरेशी जागा आहे, त्यामुळे त्या जागेवर नवीन इमारत बांधल्यावरच जुनी इमारत पाडली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे या रुग्णालयात पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मुरगाव तालुक्‍यातील गरीब व सर्वसामान्य लोकांसाठी हे एकमेव रुग्णालय असल्याने सरकारने या रुग्णालयाचा दर्जा वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- कार्लोस आल्मेदा, नगरसेवक
..............................
चिखली कुटीर रुग्णालयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत असल्याने त्या रुग्णालयाचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. त्या रुग्णालयात आमदार मावीन गुदिन्हो यांच्या प्रयत्नामुळे बऱ्याच सुविधा सध्या लाभल्या आहेत. याठिकाणी सुसज्ज व मोठे इस्पितळ उभारण्याची गरज आहे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होईल.
- फ्रान्सिस नुनीस, सरपंच, चिखली 
प्रतिक्रिया
On 04/01/2012 09:24 AM shaikh rafik said:
मला तुमचा पेपर खूप आवडतो मी दरोज वाचतो मी उक हून तुमाला मैल पटवत aahe
On 04/01/2012 09:24 AM shaikh rafik said:
मला तुमचा पेपर खूप आवडतो मी दरोज वाचतो मी उक हून तुमाला मैल पटवत aahe


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: