Last Update:
 
माझे शहर

शहराचा अमृतकलश दाबोस पाणी प्रकल्प
प्रतिनिधी
Thursday, December 15, 2011 AT 01:00 AM (IST)
वाळपई, ता. 14 ः पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. विविध कारणांमुळे अनेक ठिकाणी पाण्याची समस्या भेडसावत आहे. पण वाळपई नगरपालिका शहर तसेच सत्तरीतील अन्य पंचायतीत पाणी पुरवण्याचे काम सुरू आहे, ते वाळपई शहराला लागूनच असलेल्या दाबोस पाणी प्रकल्पातून. शहरासाठी हा प्रकल्प अमृतकलशच बनला आहे. शहरातील संपूर्ण प्रभागातील नागरिक या प्रकल्पावरच आजपर्यंत अवलंबून राहिले असून, या पाणी प्रकल्पाचा फायदा भविष्यातही लोकांना होणार आहे.

सरकारच्या पाणी पुरवठा बांधकाम खात्यामार्फत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दाबोस प्रकल्पाच्या बाजूलाच नद्या असून, या नदीतील पाणी मोटरपंपव्दारे खेचले जाते व नंतर त्याचे शुद्धीकरण करून नागरिकांना पाणी पुरविले जाते. याठिकाणी जुना पाच हजार घनमीटरचा मोठा जलकुंभ असून, नवीन दहा हजार घनमीटरचा आणखी एक जलकुंभ बांधण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण केले जाते व नंतर दाबोस गावच्या डोंगराच्या उंच टेकडीवर 3500 हजार घनमीटर टाकीत पाणी सोडले जाते व तिथून शहरात, तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या पाइप लाईनव्दारे पाणी पुरविण्यात येते. तसेच काही गावात या प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा अजूनही टॅंकरव्दारे केला जात आहे. डोंगराच्या उंच टेकडीवर ज्या टाक्‍या आहेत त्यांची पाण्याची पातळी दिवसातून चार वेळा तपासली जाते व त्यानुसार पंप बंद व सुरू केला जातो.

या प्रकल्पस्थळी हल्लीच सुशोभित झाडे, फुलांची लागवड करून बगीचाचे स्वरूप देण्यात आले आहे. सत्तरीत अशा प्रकल्पाची गरज होती व ही गरज ओळखूनच दाबोस येथे नदी काठी पाणी प्रकल्पाची उभारणी केली. गेली अनेक वर्षापासून या ठिकाणाहून पाणी पुरविले जात असून, लोक या पाण्यावरच आपली दैनंदिन कामे व तहान भागवत आहे. वाळपईतील सर्व हॉटेल्सना या प्रकल्पातूनच पाणी पुरवठा केला जातो. दाबोसहुन जी गावे दूर ठिकाणी आहे व अशा गावात काही वेळेला पाणी कमी प्रमाणात पोचते. यावर उपाय म्हणून सरकारने गावागावात जलकुंभ उभारले असून, काही ठिकाणी बांधणीचे काम सुरू आहे. त्यात कोपार्डे, म्हाऊस गावांचा समावेश आहे.

म्हाऊस गावात 150 मीटर क्‍युबीकचा लहान जलकुंभ उभारला जात असून, त्याचे ही काम अंतिम टप्यात आहे. म्हाऊस गावातील या लहान जलकुंभ प्रकल्पाची पायाभरणी 17 मे 2011 रोजी करण्यात आली व अवघ्या सात-आठ महिन्यातच हा जलकुंभ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या जलकुंभात दाबोस प्रकल्पाचे पाणी साठवून ठेवून गरजेच्यावेळी या पाण्याचा पुरवठा गावातील लोकांना केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर मात होण्यास मदत मिळेल. सरकारने असे विविध प्रकल्प उभारणीची मोहीम हाती घेतल्याने, नागरिकांत समाधान दिसत आहे. दाबोस प्रकल्प शहराबरोबरच ग्रामीण लोकांचाही मायबाप आहे. जर भविष्यात अशा प्रकल्पास हानी पोचली, तर पाण्याची तीव्र समस्या लोकांना भेडसावणार आहे. म्हणूनच या प्रकल्प क्षेत्रात विनाशकारी कामे पाणी प्रकल्पाला धोकादायक ठरतील.

एक वर्षाआधी सोनाळ, सावर्डे गावात खाणरुपी राक्षस आक्रमणाच्या तयारीत होता. पण जागरूक नागरिकांच्या लोक लढ्यामुळे खाणीचे संकट सध्यातरी टळले. पण भविष्यात ही धोक्‍याची घंटा आहे. कारण या गावात खाण उद्योग सुरू झाले, तर पाण्याची पातळी कमी होऊन दाबोस प्रकल्पावर संकट येईल. त्यासाठी जागरूकता दाखवून खाणींना विरोध करण्यातच लोकांचे कल्याण आहे. एकूणच हा पाणी प्रकल्प एक प्रकारे वाळपई शहरासाठी अमृत कलशच बनला आहे.
.....................................................
प्रतिक्रिया
दाबोस प्रकल्पस्थानी नवीन दहा हजार घनमीटरच्या जलकुंभाची उभारणी झाली असून, नवीन पाइपलाइन घालून याची सध्या चाचणी सुरू आहे. यामुळे दुसऱ्या गावांना जास्त वेळ पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
- प्रशांत गावडे, पाणी पुरवठा अधिकारी
................................
वाळपई शहरासाठी हा पाणी प्रकल्प लोकांना एक प्रकारे जीवनदान देत आला असून, सर्वांसाठी संजीवनी ठरत आहे. या पाण्यावरच सर्वजण अवलंबून असून विनाशकारी प्रकल्प या क्षेत्रात होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण खाणींमुळे दाबोस प्रकल्पावर अनिष्ट परिणाम होऊन परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय होऊन पाण्याच्या ज्वलंत समस्येला तोंड देण्याची पाळी सर्वांवरच येईल.
- रणजित राणे, नागरिक


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: