Last Update:
 
माझे शहर

म्हापसा पोलिस स्थानक अडकले समस्यांच्या कचाट्यात
प्रतिनिधी
Thursday, December 29, 2011 AT 01:00 AM (IST)
म्हापसा, ता. 28 : म्हापसा पोलिस स्टेशन हे उत्तर गोव्यातील एक मोठे पोलिस स्थानक. या पोलिस स्थानकाची कार्यकक्षाही मोठी आहे. दरवर्षी पोलिस स्थानकात दाखल होणाऱ्या दखलपात्र गुन्ह्यांची आकडेवारी वाढत आहे. पोलिस स्थानकाच्या कामातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सर्व गोष्टींची दखल घेऊन या पोलिस स्थानकाचा दर्जा, सुविधा, साधनसामग्री, अधिकारी व पोलिसांची संख्या वाढायला हवी अन्यथा येणाऱ्या काळात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

दखलपात्र गुन्ह्यांच्या संख्येच्या बाबतीत राज्यात म्हापसा पोलिस स्थानकाचा प्रथम क्रमांक लागतो. गतवर्षी या पोलिस स्थानकात एकूण 367 दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. चालू वर्षात आजअखेर सुमारे 458 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर मडगाव पोलिस स्थानकात सुमारे 446, पणजी पोलिस स्थानकात 394, तर फोंडा पोलिस स्थानकात 241 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 

म्हापसा पोलिस स्थानकात दरवर्षी दखलपात्र गुन्ह्यांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, या पोलिस स्थानकाची क्षमता वाढणे अत्यंत आवश्‍यक आहे. एक पोलिस निरीक्षक, पाच उपनिरीक्षक, सात सहाय्यक उपनिरीक्षक, वीस हवालदार व 95 पोलिस शिपाई अशी या पोलिस स्थानकाची अधिकृत क्षमता आहे. ही क्षमता 30 ते 35 वर्षांपूर्वीची आहे. आज वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ आणि पोलिसांच्या कामाचा विचार करता ही संख्या अत्यंत अपुरी आहे. शिवाय अपुरे अधिकारी व पोलिसांमुळे या पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत आहे. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

पोलिस स्थानकात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असतानाही, हवालदार व शिपायांना अधीक्षक, उपअधीक्षक कार्यालय, मंत्री, आमदारांच्या निवासस्थानी गार्ड ड्यूटीवर पाठविण्यात येते. यामुळे पोलिस स्थानकाच्या कार्यावर आणखीनच ताण वाढतो. सद्यःस्थितीत या पोलिस स्थानकात दाखल होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपास कामासाठी एक पोलिस निरीक्षक, बारा पोलिस उपनिरीक्षक, आठ सहायक पोलिस उपनिरीक्षक, तीस हवालदार व दीडशे शिपायांची गरज आहे. 

राज्यातील बहुतेक पोलिस स्थानकांना नव्या इमारती मिळाल्या. पण म्हापसा पोलिसस्थानक मात्र अद्याप जुन्या पोर्तुगीजकालीन इमारतीमध्येच कार्यरत आहे. या पोलिसस्थानकात सुविधांचा अभाव आहे. गेल्या सहा वर्षापासून पोलिस स्थानकाच्या नव्या इमारतीसाठी प्रयत्न चालू आहेत. नव्या इमारतीचा आराखडाही तयार झाला आहे. मात्र सुमारे साडेसात कोटींची ही योजना निधीविना लाल फितीत अडकली आहे. तळमजला व त्यावर दोन मजले अशा तीन मजली इमारतीची योजना कधी मार्गी लागेल याची शाश्‍वती नाही. उपलब्ध माहितीनुसार, सरकारने आर्थिक मान्यता दिली आहे. परंतु या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. अशी तरतूद जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प मार्गी लागणार नाही. 

पोलिस स्थानकाच्या इमारतीच्या एका कोपऱ्यात वाहतूक पोलिस कार्यालय आहे. या विभागाची स्थितीही वाईट आहे. उत्तर गोव्यातील म्हापसा, कळंगूट, हणजूण, पेडणे, डिचोली, वाळपई, पर्वरी या सात पोलिस स्थानकांच्या कक्षेतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम या पोलिस वाहतूक विभागाला करावे लागते. हा विभाग म्हापशातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आला होता. पण आज या विभागावर कामाचा मोठा ताण असतो. पर्यटन मोसमात कळंगुट, कांदोळी, वागातोर, हणजूण भागातील वाहन व्यवस्थेवर अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नियंत्रण ठेवणे या विभागाला फार कठीण होते. या वाहतूक पोलिस विभागात एक निरीक्षक, सहा सहाय्यक उपनिरीक्षक, एकोणीस हवालदार आणि केवळ पंधरा शिपाई असे संख्याबळ आहे. या विभागाचे कार्यक्षेत्र व आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास या विभागात एक पोलिस निरीक्षक, चार पोलिस उपनिरीक्षक, दहा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, चाळीस हवालदार व शंभर पोलिस शिपायांची गरज आहे. पण या बाबीकडे गृहखाते आणि राज्य सरकार कधी लक्ष देणार, हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
........................................
म्हापसा पोलिस स्थानकातील गैरसोयी दूर करण्यासाठी लवकरच ठोस प्रयत्न करण्यात येतील.
- विश्‍वेश कर्पे, पोलिस निरीक्षक
...............................


प्रतिक्रिया
म्हापसा पोलिस स्थानकासाठी सर्व सुविधा असलेल्या इमारतीची गरज आहे. नव्या इमारतीची सरकारची योजना आहे. आराखडाही तयार आहे. प्रकल्पाच्या खर्चाला आर्थिक मान्यताही मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात या प्रकल्पाच्या कार्यवाहीचे आश्‍वासनही दिले होते. परंतु अद्याप या प्रकल्पाच्या कामालाही सुरवात झालेली नाही. विद्यमान सरकारकडे प्रकल्पांच्या बाबतीत प्राधान्यक्रमाचे धोरणच नाही. व्यक्तिगत बाबींनाच हे सरकार प्राधान्य देते. सार्वजनिक हिताशी या सरकारला सोयरसुतकच नाही.
- आमदार ऍड. फ्रांसिस डिसोझा
.......................
या प्रकल्पात अधिकाऱ्यांचे कक्ष, प्रशासकीय कार्यालय, तक्रार विभाग, बहुद्देशीय सभागृह, पोलिस कोठडी, कोर्ट यार्ड, वाचनालय, व्हीडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा, गुन्हे तपास यंत्रणा, इंटरनेट, निवासी गाळे, प्रेस रूम, पर्यटक माहिती केंद्र व इतर अत्यावश्‍यक सुविधा असाव्यात. गुन्ह्याच्या वाढत्या आलेखानुसार पोलिस अधिकारी व शिपायांची संख्या, आवश्‍यक वाहने व इतर सोयी असाव्यात.
- संदीप फळारी, नगरसेवक
...........................
म्हापसा पोलिस स्थानकाची कार्यकक्षा वाढली आहे. त्यामानाने पोलिस मनुष्यबळ कमी आहे. साधनसुविधांचाही अभाव आहे. पोलिस स्थानकात अनेक गैरसोयी आहेत, त्या दूर व्हायला हव्यात. पोर्तुगीज राजवटीतील अन्याय, अत्याचारांची आठवण करून देणाऱ्या इमारतींच्या जागी सर्व सुविधा असलेली भव्य इमारत होणे गरजेचे आहे. पोलिसांचे मनोबल वाढविणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- प्रभाकर वेर्णेकर, माजी नगराध्यक्ष  
प्रतिक्रिया
On 04/09/2012 10:15 PM shrirammoghe said:
मी सध्या क्यानडात आहे. येथील पोलीस यंत्रणा आधुनिक असून सुसंकृत आहे. त्यांचा धाक सर्वाना आहे. त्यांना सर्व साधन सामग्री दिली जाते. गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. लोकसंख्या कमी असल्याने सुरक्षितता आहे. गोव्यातील नगरसेवकांनी उत्तम सूचना केल्या आहेत. गोवा अजूनही सुंदर व सुरक्षित दिसते. शासनाने कंजुषपणा न करता पोलीस यंत्रणेला उत्तम सुविधा देणे आवश्यक आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: