पणजी, ता. 9 ः गोव्यातील 184 पंचायतींच्या निवडणुका आठ दिवसांवर येऊन ठेपल्या तरी प्रभाग फेररचना व राखीवतेतील गोंधळ, हेराफेरीच्या मुद्यावरून राज्यात अजूनही आवाज उठवणे चालूच ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंचायत बचाव अभियानतर्फे सोमवार 14 मे रोजी पणजीतील पंचायत संचालकांच्या कार्यालयासमोर दिवसभराचे धरणे धरण्यात येणार आहे.
पंचायत प्रभाग फेररचनेत विविध पातळीवरील लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून आपल्या उपयुक्त ठरतील असे बदल करून घेतले आहेत. दुरुस्त्या करा म्हटल्यास पंचायत संचालक मर्जीतल्याच लोकांचे काम करीत असून राज्य निवडणूक आयोग अधिकार असूनही हस्तक्षेप करीत नसल्याचा आरोप पंचायत बचाव अभियानचे अनिल झांगळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
कळंगुट पंचायतीची प्रभाग फेररचना करण्यासाठी दोनदा अधिसूचना, दुरुस्त्या काढल्या जातात, निवडणूक पुढे ढकलली जाते मग इतर पंचायतींनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई पंचायत संचालक का करीत नाहीत असा प्रश्न त्यांनी केला.
प्रभाग फेररचना व राखीवतेत गोंधळ झाल्याबद्दल जोरदार निदर्शने झाली, आवाज उठवण्यात आला परंतु सरकार अन्याय दूर करण्यास राजी नाही मग पंचायत निवडणुका मुक्त वातावरणात झाल्या असे कसे म्हणता येईल, असा प्रश्न त्यांनी केला. पंचायत निवडणुकीतील या गोंधळामुळे लोकशाहीलाच धोका निर्माण झाला असून निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीपणे होईल व भविष्यात पंचायतींचा कारभार भ्रष्टाचारविरहित, पारदर्शक असेल याची खात्री देता येत नसल्याचा दावा त्यांनी केला.
पंचायत प्रभाग फेररचना, राखीवतेतील गोंधळ दूर करण्याचे घटनात्मक, लोकशाही मार्गाने मिळालेले हक्क डावलले जात असून त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पंचायत बचाव अभियानखाली आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पंचायतीतील प्रभाग फेररचनेतला अन्याय दूर झालेला नाही त्यांची एकजूट बांधून लढा देण्यासाठी अभियानने पाऊल उचलले असून त्याचा एक भाग म्हणून येत्या सोमवार 14 रोजी एका दिवसाचे धरणे होणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत हे धरणे होणार असून त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ऊर्मिला गावस, सेबस्तियाव गामा, अरुणा टी. धुरी यावेळी उपस्थित होते.
कळंगुटमध्ये अजूनही अन्याय
कळंगुट पंचायत प्रभाग फेररचनेत दुरुस्त्या करण्यात आल्या, दोनदा अधिसूचना काढल्या व निवडणूकही पुढे ढकलली गेली परंतु वास्तवात काही प्रभागांतील अन्याय अद्याप दूर झालेला नाही, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पंचायत प्रभाग फेररचनेत हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी केला.