Last Update:
 
मुख्य पान

चोर्ला घाटात पट्टेरी वाघांचा संचार
प्रतिनिधी
Friday, May 11, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: goa,   gomantak,   tiger
पर्ये, ता. 10 - सत्तरीतील म्हादई अभयारण्याच्या कक्षेत येणाऱ्या आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमाभागात असलेल्या चोर्ला घाट परिसरात गेल्या दोन महिन्यापासून पट्टेरी वाघांचा संचार वाढल्याचे आढळून आले आहे.
दोन दिवसांपूर्वी अंजुणे धरणाच्या जलाशयाच्या पणसुली भागात पट्टेरी वाघांचे ठसे आढळले आहेत. केरीतील पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर यांनी या परिसराला भेट दिली असता हे ठसे त्यांच्या निर्दशनास आले. येथे आढळलेले हे ठसे मादी व तिच्या बछड्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. अंजुणे जलाशयाचा गाळाचा साच काढण्यासाठी कार्यरत असलेल्या जलसंसाधन खात्याच्या कर्मचाऱ्यांनाही येथे यापूर्वी असे ठसे आढळले असून, बऱ्याच वेळा त्यांना वाघाच्या डरकाळ्याही ऐकू आल्या आहेत.
सद्या या परिसरात नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटलेले असल्याने पट्टेरी वाघ आणि अन्य श्‍वापदांनी आपला मोर्चा अंजुणे जलाशयापाशी वळवलेला आहे. त्यामुळे येथे सद्या वाघांचा संचार वाढलेला आढळतो. या घटनेची माहिती म्हादई अभयारण्य क्षेत्राचे अधिकारी विश्‍वास चोडणकर यांना दिली आहे.
चोर्ला घाट व परिसरात गेल्या दोन महिन्यापासून पट्टेरी वाघांचे वारंवार दर्शन व अस्तित्वाचे पुरावे बऱ्याच जणांना आढळलेले आहेत. कर्नाटकातून रात्रीच्यावेळी चोर्ला घाटमार्गे खडीची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरना बऱ्याचदा रस्त्याच्या मधोमध लोळण घालीत असलेले पट्टेरी वाघ आढळले आहेत. चार दिवसांपूर्वी घाट मार्गावर असलेल्या "वाईल्डरनेस्ट' या रिसॉर्टमधील सुरक्षा रक्षकांना हॉटेल परिसरात पट्टेरी वाघाच्या डरकाळ्या ऐकू आल्या होता, तसेच पावलांचे ठसे आढळल्याचे कळते. तत्पूर्वी आठवड्यापूर्वी केरीतील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे चेतन पारोडकर यांनाही अंजुणे जलाशय परिसरात पट्टेरी वाघाच्या पावलांचे ठसे आढळले आहेत. म्हादई अभयारण्य शेजारील महाराष्ट्रातील विर्डी येथील वझरा सकला धबधबा परिसरात विर्डीतील दयानंद घाडी यांना तर प्रत्यक्ष वाघाच्या जोडप्याचे दर्शन झालेले होते. हे जोडपे एक रानडुक्कराला फरफटत ओढत नेताना पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
या संबंधी गोवाचे प्रधान मुख्य वनपाल रिचर्ड डिसोझा यांनी म्हादई अभयारण्यातील भागाच्या वावराबद्दल दुजोरा दिलेला आहे. वाघांचे अधिवास आणि त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी हल्लीच स्पष्ट केले आहे. म्हादई अभयारण्याचे वन अधिकारी विश्‍वास चोडणकर यांनी चोर्ला घाटात वन रक्षकांची नियुक्ती केली असून, रात्रीची गस्त वाढवली आहे. तर केरी वनक्षेत्राचे वनाधिकारी दीपक बेतकेकर यांनी वाघांचा संचार असलेल्या परिसराला भेट देऊन, कर्मचाऱ्यांना या संदर्भात काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत.

तीन वर्षांपासून अधिवास
दरम्यान गेल्या तीन वर्षापासून या परिसरात पट्टेरी वाघाचे अस्तित्व वेळोवेळी आढळले आहे. फेब्रुवारी 2009 मध्ये चोर्ला घाटातील चरावणे येथे वाघाकडून रेड्याचा फडशा पाडला होता. याच दरम्यान केरीतील तथाकथित व्याघ्र हत्या प्रकरण पुढे आले होते. याशिवाय ऑगष्ट 2009 मध्ये दिलीप प्रभुदेसाई (मडगाव) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाघेरी परिसरात वाघांच्या पावलांचे ठसे व आरोळी ऐकली होती. सप्टेंबरमध्ये पणसुलीतील साई पिंगळे यांच्या गाईचा वाघाकडून फडशा पाडला होता. डिसेंबर 2010 मध्ये पांडुरंग गावस घोटेली यांना चोर्ला घाट मार्गात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले होते, तर याच दरम्यान अंजुणे जलाशय परिसरात परशुराम कांबळी यांना पावलांचे ठसे आढळले होते. त्यावेळी तत्कालीन प्रधान मुख्य वनपाल शशिकुमार यांनी या ठशांची पाहणीही केलेली होती. यानंतर फेब्रुवारीमध्ये चरावणेतील मानो फाले यांच्या म्हैस व रेडा वाघाने मारला होता. ऑक्‍टोबर 11 मध्ये केरीतील गोपीनाथ गावस म्हादई अभयारण्य शेजारील विर्डी परिसरात सांबराचा सांगाडा आणि वाघांच्या पावलांचे ठसे आढळले होते.

गोवा सरकार थंड
म्हादई अभयारण्यात असलेल्या वाघाच्या संचाराची जाण तत्कालीन केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांना असल्याने, या भागाला संरक्षण प्राप्त होण्यासाठी एप्रिल 2011 मध्ये गोवा सरकारला म्हादई अभयारण्य क्षेत्राचा म्हादई व्याघ्र क्षेत्र प्रकल्प म्हणून प्रस्ताव पाठवावा, असे पत्र त्यांनी पाठवले होते. पण अजूनपर्यंत गोवा सरकारने या संदर्भातले आपले मत स्पष्ट केलेले नाही.



 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: