Last Update:
 
मुख्य पान

देसाई गेल्यानंतर "जीसीए'त भ्रष्टाचार झाला का?
(क्रीडा प्रतिनिधी)
Friday, May 11, 2012 AT 03:45 AM (IST)
Tags: goa,   gomantak,   gca
पणजी, ता. 10 - गोवा क्रिकेट असोसिएशनमधील (जीसीए) कथित भ्रष्टाचाराची चौकशी करणारे चेतन देसाई जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असेपर्यंत सारा कारभार पारदर्शक होता आणि ते जीसीएतून जाताच भ्रष्टाचार माजला का, असा खडा सवाल जीसीएचे अध्यक्ष ऍड. दयानंद नार्वेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. जीसीएची निवडणूक जाहीर झाली असून, त्या अनुषंगाने संलग्न क्‍लबांवर दबाव टाकण्याचा देसाई यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तीन क्‍लबांनी तक्रार केल्यानुसार सहकार निबंधक खात्यातील महानिरीक्षकांनी देसाई व अनिल लावणीस यांची द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र हा आदेश अजून सरकारी राजपत्रात अधिसूचित झालेला नाही, त्यापूर्वीच देसाई चौकशीसाठी गडबड करत आहेत. त्यामागे वेगळेच कारण आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर क्‍लबांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा खटाटोप असल्याचा दावा ऍड. नार्वेकर यांनी केला. मेरशी येथील स्टॅमिना क्रिकेट क्‍लब, शिरोडा येथील स्टॅमिना स्पोर्टस क्‍लब व कुडचडे जिमखाना या क्‍लबांनी तक्रार केली होती. त्यापैकी कुडचडे जिमखाना हा क्‍लबच जीसीएशी सध्या संलग्न आहे आणि बाकी दोन क्‍लब गेली काही वर्षे शुल्क न भरल्यामुळे बाद ठरले असल्याची बाब ऍड. नार्वेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली.

तेव्हा सारे सुरळीत होते का?
""ते (देसाई) जीसीएत होते तोपर्यंत सारे काही सुरळीत होते का? नेमके त्यांना काय हवे आहे हेच आम्हाला कळेनासे झाले आहे,'' असे सांगून चौकशी प्रकरणी देसाई यांनी जीसीएशी कोणत्याच प्रकारे संपर्क साधला नव्हता, ते जीसीएत येणार हे आम्हाला प्रसिद्धी माध्यमाद्वारेच कळले, असे ऍड. नार्वेकर यांनी नमूद केले. सध्या जीसीएच्या पर्वरी येथील मैदानावर लहान मुले व मुलींचे शिबिर सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जीसीएच्या मुख्य फाटकाला कुलूप लावण्यात आले आहे. देसाई यांनी योग्यप्रकारे आमच्याशी संपर्क साधला असता, तर निश्‍चितच त्यांना जीसीएत प्रवेश दिला असता, असेही जीसीएच्या अध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले.
जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीत 2003-2006, 2006-2009 व 2009-2012 या कालावधीसाठी देसाई यांची निवड झाली होती. गोव्यात ऑक्‍टोबर 2010 मध्ये झालेल्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचे आयोजन अध्यक्षपदाची जबाबदारीही देसाई यांच्यावर होती. या सामन्याच्या तिकीट क्रमांक छपाईप्रकरणी गडबड झाली. त्याची जबाबदारी देसाई यांच्यावरच होती, असे ऍड. नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर 29 ऑक्‍टोबर 2010 रोजी ते व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीस शेवटचे उपस्थित राहिले. नंतर कोणतेही कारण न देता सलग बैठकांना अनुपस्थितीत राहिल्यामुळे गतवर्षी जीसीएच्या घटनेनुसार त्यांना व्यवस्थापकीय समितीतून वगळण्यात आले. त्यानंतर 1 एप्रिल 2011 पासूनचे इतिवृत्त देसाई यांनी चौकशी समितीचा सदस्य या नात्याने जीसीएकडे मागितले आहे, ही कृती आश्‍चर्यचकित करणारी आहे, असे ऍड. नार्वेकर यांनी सांगितली. देसाई यांनी वैयक्तिक पातळीवर बॅंकांना पत्र पाठवून खाती गोठवण्यासंबंधी मागणी करणे कितपत योग्य आहे, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. जीसीएची निवडणूक ठरल्याप्रमाणेच 27 मे रोजी होईल, असेही त्यांनी ठासून सांगितले.
"देसाई यांनी बीसीसीआयमध्ये कोणाशी चर्चा केली याची काही माहिती नाही, मात्र याप्रकरणी आम्हाला बीसीसीआयकडून कोणत्याच प्रकारची विचारणा झालेली नाही', असे ऍड. नार्वेकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.

"खंवटे प्रसिद्धीला हपापलेले'
जीसीएकडून पर्वरीतील मैदानावर विनापरवाना बांधकाम झाल्याचा आरोप आमदार रोहन खंवटे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ऍड. नार्वेकर यांनी आमदार खंवटे यांचाही समाचार घेतला. "आमदार खंवटे सवंग प्रसिद्धीला हपापलेले आहेत. त्याऐवजी त्यांनी आपल्या मतदारसंघात भरीव कार्य करावे, पर्वरी मतदार संघात करण्यासाठी भरपूर कामे आहेत', असा सल्ला त्यांनी दिला. आमदार या नात्याने खंवटे यांना क्रिकेट मैदानात यायचे असल्यास यांचे स्वागतच करू, असे ते म्हणाले. पर्वरी येथील जीसीए अकादमीसमोरच स्वायत्त संस्था असलेल्या गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) पेन्ह-द-फ्रान्स पंचायतीची परवानगी न घेता शिक्षण मंडळाची इमारत बांधलेली आहे, तेव्हा सरकारी जागेत जीसीए पंचायतीच्या परवानगीशिवाय बांधकाम करू शकते, असा दावाही ऍड. नार्वेकर यांनी केला.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: