Last Update:
 
क्रीडा

गोव्याचे लक्ष्य संतोष करंडक जिंकण्याचे
(क्रीडा प्रतिनिधी)
Tuesday, May 15, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: goa
पणजी, ता. 14 ः गोव्याने तीन वर्षांपूर्वी संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पाचव्यांदा जिंकली होती, त्यानंतर पदरी अपयशच आले. यंदा गोव्याच्या युवा संघाने ओडिशात होणारी स्पर्धा जिंकून पुन्हा एकदा देशात सर्वोत्तम ठरण्याचे लक्ष्य बाळगले आहे. ""राज्याला आम्ही करंडक देण्याचा निश्‍चय केला आहे,'' असा आत्मविश्‍वास संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू डिकॉस्टा यांनी सोमवारी व्यक्त केला. 

जुझे कुलासो याच्या नेतृत्वाखालील गोव्याच्या 20 सदस्यीय संघाची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. गोव्याला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश असून पहिला सामना 18 मे रोजी होणार आहे. संघाला "किंगफिशर'ने पुरस्कृत केले आहे. चमू मंगळवारी (ता. 15) रवाना होईल. पत्रकार परिषदेत गोवा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष एल्विस गोम्स, सदस्य आमदार बेंजामिन डिसिल्वा, "किंगफिशर'चे विभागीय उपाध्यक्ष गोविंद तिवारी आदी उपस्थित होते.

सर्वोत्तम खेळाचा विश्‍वास
""गेले तीन आठवडे आम्ही संघ बांधणीवर भरपूर मेहनत घेतलेली आहे. धेंपो क्‍लबबरोबर दोन, स्पोर्टिंग क्‍लबबरोबर एक सराव सामना झाला. एकंदरीत युवा खेळाडूंची तयारी उत्साहवर्धक आहे,'' असे मॅथ्यू यांनी सांगितले. स्पर्धेच्या नियमानुसार, संघात आय-लीग खेळाडूंना घेता येत नाही. त्याविषयी मॅथ्यू म्हणाले, ""सुरवातीला आय-लीग खेळाडूंविना संघ बांधणी करताना काहीसे अवघड ठरले, परंतु नंतर साऱ्या खेळाडूंचा जम बसला. त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळाचा विश्‍वास आहे.'' सध्या संघाने सामन्यागणिक तयारी करायची ठरविल्याचेही त्यांनी सांगितले. कर्णधार जुझे कुलासो याने सांगितले, की ""मैदानावर सर्वोत्तम खेळ करणे आणि करंडक जिंकणे हेच आमचे ध्येय आहे.''

तिघेच अनुभवी
गोव्याच्या संघातील फक्त तिघाच खेळाडूंना संतोष करंडक स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. कर्णधार जुझे कुलासोसह गॅब्रिएल फर्नांडिस व फुलजेन्सिओ कार्दोझ यांनीच यापूर्वी या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

संघ असा
कर्णधार ः जुझे कुलासो, मॅक्‍लास मोराईस, आग्नेल नोरोन्हा, जयगणेश गोलतेकर, जेसेल कार्नेरो, आग्नेल बारेट्टो, गॅरी डिमेलो, फुलजेन्सिओ कार्दोझ, वेलिंग्टन फर्नांडिस, कीनन आल्मेदा, पेरीसन रिबेलो, सचिन गावस, जेरोस ऑलिव्हेरा, प्रतेश शिरोडकर, जोएल सिक्वेरा, व्हेलिटो डिक्रूझ, गॅब्रिएल फर्नांडिस, आग्नेल कुलासो, रक्षक नाईक व प्रमोद म्हार्दोळकर, प्रशिक्षक ः मॅथ्यू डिकॉस्टा, सहप्रशिक्षक ः पास्कॉल परेरा, गोलरक्षक प्रशिक्षक ः चंद्रकांत नाईक, फिजिओ ः संदेश गडेकर, व्यवस्थापक ः वेल्विन मिनेझिस, पथक प्रमुख ः बाबली मांद्रेकर.

गोव्याची विजेतीपदे
वर्ष विरुद्ध निकाल

1982-83 बंगाल संयुक्त विजेते
1983-84 पंजाब 1-0
1989-90 केरळ 2-0
2005-06 महाराष्ट्र 1-0
2008-09 बंगाल 4-2
(टायब्रेकरमध्ये)  


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: