Last Update:
 
क्रीडा

जीसीए अध्यक्षांना फक्‍त दोनच "टर्म'
(क्रीडा प्रतिनिधी)
Wednesday, May 30, 2012 AT 04:00 AM (IST)
Tags: goa
पणजी, ता. 29  ः गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अध्यक्षांना सध्या आजीवन अध्यक्षपद भूषविण्याची मुभा आहे, मात्र त्यात बदल करून अध्यक्षाला फक्त दोनच "टर्म' पद भूषवायला मिळणार आहे. यासंबंधी जीसीए घटनेत बदल करणार असून आमसभेचीही मान्यता मिळविणार आहे. ही माहिती जीसीएचे अध्यक्ष विनोद फडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी जीसीएचे आदेश झुगारून निवडणुकीसंदर्भात न्यायालयात गेलेल्या आठ क्‍लब्सवर कडक कारवाई करण्याचे संकेतही फडके यांनी यावेळी दिले. 

"जीसीएच्या सुरवातीच्या घटनेनुसार अध्यक्षाला फक्‍त दोनच वेळा हे पद भूषवीता येत असे. त्यानंतर माजी अध्यक्षांनी स्वतःच्या सोयीसाठी घटनेत बदल करून अध्यक्षपद आजीवन बनविले. जीसीए ही कोणाची मालमत्ता नाही. आम्ही आता पूर्वीप्रमाणे अध्यक्षांचा कालावधीत दोन "टर्म'साठीच करण्यात अनुकूल आहोत,' असे फडके यांनी पत्रकारांना सांगितले. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी 4 जून रोजी व्यवस्थापकीय समितीची बैठक होईल. त्यात संबंधित निर्णय होईल व त्यास मान्यता मिळविण्यासाठी 24 जून रोजी आमसभा बोलावण्यात येईल, असेही फडके यांनी स्पष्ट केले.

निवडणूक 22 जुलैला?

जीसीएची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक 22 जुलैला घेण्यासंदर्भात फडके यांनी सूतोवाच केले. संलग्न क्‍लबांच्या तक्रारीनंतर जीसीएने नियुक्त केलेल्या लवादाने गेल्या 27 मे रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. "येत्या 25 जुलैपर्यंत जीसीएची निवडणूक घेण्याचे आश्‍वासन आमच्या वकिलाने काल मडगाव येथे न्यायालयास दिलेले आहे. ठरलेल्या कालावधीअगोदर आम्हाला निवडणूक घ्यायची आहे. 24 रोजी घटना बदलासंदर्भात आमसभा झाल्यानंतर 25 जून रोजी व्यवस्थापकीय समितीची बैठक होईल. त्यावेळी निवडणुकीसाठी जास्त करून 22 जुलै रोजी आमसभा बोलावण्याविषयी निर्णय होईल,' असे फडके म्हणाले. सध्या जीसीएला 110 पैकी 103 क्‍लबांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला. ऍड. दयानंद नार्वेकर यांच्या जीसीएतून बडतर्फीसाठी सहा महिन्यात केव्हाही आमसभा घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करणे शक्‍य असल्याची माहितीही त्यांनी दिली.

"त्या' क्‍लब्सवर कारवाई
निवडणुकीसंदर्भात जीसीएने इशारा दिलेला असतानाही न्यायालयात धाव घेतलेल्या आठ क्‍लब्सविरुद्ध कारवाई केली जाईल, असे जीसीएचे सचिव प्रसाद फातर्पेकर यांनी नमूद केले. सोमवारी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात याचिका फेटाळली होती. "जीसीएचा आदेश झुगारून न्यायालयात दाद मागण्यास गेलेल्या क्‍लब्सवर आम्ही कारवाई करणार आहोत, तसेच लवादाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवलेल्या ऍड. दिलीप दाबोळकर व मॅक्‍स फुर्तादो यांच्यावरही कारवाई होईल,' असे फातर्पेकर म्हणाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेती स्पोर्टस अँड कल्चरल क्‍लब, बादे क्‍लब, महालक्ष्मी क्‍लब, विविधा क्‍लब, ऑक्‍सफर्ड क्‍लब, मनोर्वा क्‍लब, क्रिकेट क्‍लब ऑफ फोंडा व अमरावती क्‍लब यांनी जीसीएचा आदेश जुगारला आहे.

"क्रिकेटवर परिणाम नाही'
जीसीएत सध्या वाद असला, तरी त्याचा परिणाम मैदानी क्रिकेटवर अजिबात होणार नाही, अशी ग्वाही विनोद फडके यांनी दिली. क्रिकेट प्रशिक्षणात खंड पडणार नाही, तसेच 14 आणि 16 वर्षे वयोगटातील प्रत्येकी 20 खेळाडू निवडून त्यांना निवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. शैक्षणिक पातळीवर संबंधित शाळांशी चर्चा सुरू आहे. ती यशस्वी ठरली की ही योजना कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले. जीसीएच्या "कोचिंग स्टाफ'मध्ये माजी कसोटीपटू रघुराम भट, विवेक कोळंबकर, कॉलिन रॉड्रिग्ज असे अनुभवी प्रशिक्षक आहेत. त्यामुळे सध्यातरी बलविंदरसिंग संधू यांची जीसीएला गरज नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. 


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: