Last Update:
 
क्रीडा

गोव्याची इव्हाना आशियायी "क्वीन'
(क्रीडा प्रतिनिधी)
Friday, June 08, 2012 AT 04:00 AM (IST)
Tags: goa,   chess,   gomantak,   sports
पणजी, ता. 7 - गोव्याची माजी जागतिक विजेती इव्हाना फुर्तादो हिने आशियायी ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गुरुवारी केला. उझबेकिस्तानमधील ताश्‍कंद येथे झालेल्या या स्पर्धेत तेरा वर्षीय इव्हानाने अपराजित कामगिरी करताना 9 फेऱ्यांतून सर्वाधिक 7.5 गुण प्राप्त केले. विश्‍वनाथन आनंदच्या पाचव्या जगज्जेतेपदाची आठवण ताजी असतानाच इव्हानाने भारतीय बुद्धिबळात विजेतेपदाला गवसणी घातली आहे.
वीस वर्षांखालील गटातील या स्पर्धेत इव्हाना (एलो 2065) हिचे यश उल्लेखनीय ठरले. तिने शेवटच्या फेरीत भारताचीच आर. भारती (एलो 2088) हिला हरविले. एकही डाव न गमावलेल्या इव्हानाने 6 विजय व 3 बरोबरी अशी कामगिरी बजावली. तिला या स्पर्धेत नववे मानांकन होते. या स्पर्धेत व्हिएतनामची वूमन इंटरनॅशनल मास्टर व्हो थि किम फुंग उपविजेती ठरली, तर भारताचीच ऋचा पुजारी ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. या दोघींचे समान 6.5 गुण झाले. ऋचाने शेवटच्या फेरीत भारताच्या जे. सरन्या हिला हरविले असते, तर इव्हानाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असते. काल आठव्या फेरीनंतर इव्हाना व ऋचा यांचे समान 6.5 गुण होते. या स्पर्धेत 6 देशांतील 23 खेळाडूंचा समावेश होता.

"डब्ल्यूआयएम' किताबास पात्र
ताश्‍कंदमध्ये यशस्वी ठरल्यामुळे इव्हाना आता वूमन इंटरनॅशनल मास्टर (डब्ल्यूआयएम) किताबासाठी पात्र ठरली आहे, अशी माहिती गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव अरविंद म्हामल यांनी दिली. फिडेच्या नियमानुसार आशियायी ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यामुळे तिला हा किताब मिळेल, तसेच ती वूमन ग्रॅंडमास्टरच्या (डब्ल्यूजीएम) पहिल्या नॉर्मसाठीही पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले. भक्ती कुलकर्णी गोव्याची पहिली "डब्ल्यूआयएम' आहे.

परंपरा राखली
गतवर्षी कोलंबो येथे झालेल्या आशियायी ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या भक्ती कुलकर्णीने विजेतेपद मिळविले होते, यंदा इव्हानाने ही परंपरा कायम राखल्यामुळे गोमंतकीय मुलींचे बुद्धिबळातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे म्हामल यांनी नमूद केले. "डब्ल्यूआयएम' किताबासाठी पात्र ठरलेली इव्हाना गोव्याची दुसरी आणि सर्वांत तरुण बुद्धिबळपटू ठरली आहे. भक्तीला हा किताब 18व्या वर्षी मिळाला होता. भक्तीला यंदा ताश्‍कंदमधील स्पर्धेत अपयश आले. तिला 9 फेऱ्यांतून फक्त 4.5 गुण प्राप्त करता आले, त्यामुळे ती तब्बल 14 व्या स्थानी घसरली. या स्पर्धेत भक्तीला दुसरे मानांकन होते.

इव्हानाचे अभिनंदन
आशियायी बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेल्या इव्हानाचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आशिष केणी, खजिनदार किशोर बांदेकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक रघुनंदन गोखले, तसेच राज्यातील इतर बुद्धिबळप्रेमींनी अभिनंदन केले आहे.

यशाचा आलेख कायम...

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मडगाव येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकल्यामुळे इव्हाना आशियायी स्पर्धेसाठी पात्र ठरली होती. 2006 व 2007 मध्ये 8 वर्षांखालील गटात जागतिक विजेतेपद मिळवलेल्या इव्हानाचे ताश्‍कंदमधील 13वे प्रमुख आंतरराष्ट्रीय पदक जिंकले. 2011 मध्ये फिलिपिन्स येथे झालेल्या 12 वर्षांखालील आशियायी बुद्धिबळ स्पर्धेत इव्हानाने सुवर्णपदक मिळविले होते, आता मोठ्या वयोगटात खेळतानाही तिने यशाचा आलेख कायम राखला आहे. आशियायी पातळीवरील तिचे हे तिसरे विजेतेपद ठरले. 2007 मध्ये ती 8 वर्षांखालील गटात आशियायी विजेती ठरली होती.

प्रतिक्रिया
On 11/06/2012 05:46 PM saju said:
Congratulation


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: