Last Update:
 
क्रीडा

पेस-भूपतीची मोट कशाला बांधता
-
Monday, June 18, 2012 AT 10:36 PM (IST)
Tags: sports
नवी दिल्ली, ता. 18 ः लिअँडर पेस आणि महेश भूपती एकमेकांसह खेळण्यास तयार नाहीत, मग त्यांना एकत्र खेळविण्याचा अट्टहास कशाला, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ऑलिंपिकसाठी दोन जोड्यांची निवड करण्याची सूचना सोमवारी केंद्रीय क्रीडा खात्याने अखिल भारतीय टेनिस संघटनेस केली आहे. एवढेच नव्हे, तर या संदर्भात अंतिम निर्णय उद्या दुपारपर्यंत घेण्याचा आदेशही संघटनेस देण्यात आला आहे.
दरम्यान, महेश भूपतीपाठोपाठ रोहन बोपण्णानेही लिअँडर पेसच्या साथीत ऑलिंपिकमध्ये दुहेरीत खेळण्यास नकार दिल्यामुळे अखिल भारतीय टेनिस संघटनेचे एकच सर्वोत्तम जोडी पाठविण्याचे प्रयत्न फोल ठरले. केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी दोन जोड्या पाठविण्याचा आदेशच भारतीय टेनिस संघटनेस दिला आहे. ""केंद्रीय क्रीडा खात्याने ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी खेळाडूंना आर्थिक साह्य केले आहे. या परिस्थितीत ऑलिंपिकसाठी जोडी म्हणून पात्र ठरलेल्या खेळाडूंना संधी नाकारणे चुकीचे आहे. महेश भूपती आणि रोहन बोपण्णाने लिअँडर पेसच्या साथीत खेळण्यास नकार दिला आहे. भारतास दोन जोड्यांना पाठविण्याची संधी आहे. या परिस्थितीत पेसच्या साथीला एका नवोदिताची निवड करणे शक्‍य आहे. मात्र टेनिस संघटना एका नवोदिताची संधी नाकारत आहे,'' असे केंद्रीय क्रीडा खात्याच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भूपती आणि बोपण्णा ही जागतिक जोडी क्रमवारीतील भारताची सर्वोत्तम जोडी आहे, पण टेनिस संघटनेने त्यांची निवड करणे टाळले. यापूर्वी कधीही टेनिस संघटनेने दुहेरीतील सरस क्रमांकाच्या खेळाडूची निवड होईल असे स्पष्ट केले नव्हते. यापूर्वी चार ऑलिंपिक एकमेकांच्या साथीने खेळलेल्या, पण पदक न जिंकता मायदेशी परतलेल्या जोडीस खेळविण्यासाठी संघटना का आग्रही आहे, हेच कळत नाही. पेस आणि भूपतीने यापूर्वी अनेकदा एकमेकांच्या साथीत खेळण्यास नकार दिला आहे, मग त्यांना खेळविण्याचा अट्टहास कशाला, याचीही कारणे देण्यास क्रीडा खात्याने संघटनेस सांगितले आहे. त्याचवेळी उद्यापर्यंत याचे उत्तर देताना या खेळाडूंबरोबर संघनिवडीबाबत काय चर्चा झाली होती, हेही स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

पेस साथीदार नकोच ः बोपन्ना
ऑलिंपिक स्पर्धेत आपण पेससह खेळण्यास तयार नाही, असे बोपण्णाने स्पष्ट केले आहे. त्याने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतानाच आपण ऑलिंपिक लक्षात घेऊनच भूपतीसह खेळण्याचे ठरविले, असे सांगितले आहे. ""ऑलिंपिक लक्षात घेऊन मी एहसाम कुरेशी याच्याबरोबरची जोडी तोडली. ऑलिंपिकची पूर्वतयारी करताना सहकाऱ्यात समन्वय असणे आवश्‍यक असते. एहसामच्या साथीत खेळत असताना मी जागतिक क्रमवारीत आठवा होतो. हीच जोडी कायम ठेवली असती, तर माझे जागतिक मानांकन टॉप टेनमध्ये राहिले असते. पण त्याचा ऑलिंपिकसाठी फायदा झाला नसता. पूर्वतयारी योग्य झाली नसती, हाच विचार करून मी या वर्षाच्या सुरवातीपासून महेश भूपतीसह खेळण्याचे ठरविले. याची पूर्ण कल्पना भारतीय टेनिस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. आता यापूर्वी मी पेससह केवळ दोन लढती खेळलो आहे, त्यामुळे आमची एकमेकांच्या साथीत खेळण्याची पुरेशी पूर्वतयारी नाही, हेच दिसून येईल. त्यामुळेच पेससह ऑलिंपिकमध्ये खेळण्यास मी तयार नाही, असे बोपण्णाने स्पष्ट केले आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: