Last Update:
 
क्रीडा

भूपती किंवा बोपण्णा नसतील तर खेळणारच नाही -पेस
प्रतिनिधी
Thursday, June 21, 2012 AT 12:34 AM (IST)
Tags: -
नवी दिल्ली, ता. 20 ः ऑलिंपिकमध्ये माझा दुहेरीचा सहकारी म्हणून महेश भूपती किंवा रोहन बोपण्णा खेळणार नसतील, तर मी ऑलिंपिकमध्ये खेळतच नाही. अन्य कोणत्याही दुय्यम सहकाऱ्याच्या साथीत खेळण्याची माझी तयारी नाही, अशी आक्रमक भूमिका लिअँडर पेसने घेतली आहे. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महेश भूपती, लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णा यांच्यासह चर्चा करून प्रश्‍न सोडविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; पण अखेर हा निर्णय उद्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.
ऑलिंपिकसाठी पेसला पाठविण्यावर टेनिस संघटना अजूनही ठाम आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जोड्या खेळविण्याच्या प्रस्तावदेखील त्यांच्या विचाराधीन असल्याचे समजते. महेश भूपती, लिअँडर पेस, रोहन बोपण्णा विंबल्डनसाठी सध्या लंडनमध्ये असून, टेनिस संघटना सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत. भूपती आणि बोपण्णाने पेसच्या साथीत खेळण्यास नकार दिल्यामुळे पेसने अन्य खेळाडूच्या साथीत जोडी करावी इथपर्यंत टेनिस संघटना येऊन पोचली आहे. मात्र, आता पेसने हा प्रस्ताव नाकारला आहे. ""देशासाठी कोणाच्याही साथीत मी खेळण्यास तयार आहे; पण त्याच वेळी खूपच दुय्यम खेळाडूच्या साथीत मी खेळणे अयोग्य होईल, त्याऐवजी अन्य खेळाडूंनी खेळणे योग्य ठरेल,'' असे सांगत पेसने टेनिस संघटनेनेचा प्रस्ताव नाकारला.
आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या नियमानुसार भारताला उद्या गुरुवारपर्यंत खेळाडूंची नावे पाठवायची आहेत. त्यामुळे टेनिस संघटना भूपती आणि बोपण्णाचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहे. ऑलिंपिकमध्ये भारताची अव्वल जोडीच जावी यासाठी टेनिस संघटना प्रयत्नांची शर्थ करत आहे. पण, भूपती आणि बोपण्णा हे आपली भूमिका बदलण्यास तयार नाहीत. त्यामुळे टेनिस संघटनेने पेससमोर युकी भांब्री आणि विष्णू वर्धनच्या साथीत खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण, त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा धूसर होणार आहेत. मात्र, पेसचे वडील व्हेस पेस यांनी दिलेल्या माहितीनुसार पेस टेनिस संघटना सुचवेल त्या खेळाडूबरोबर खेळण्यास तयार असल्याचे समजते.
---------------------------------
तेढ कशात
- जागतिक क्रमवारीत दुहेरीत दहांत असल्यामुळे लिअँडर पेसला ऑलिंपिकमध्ये थेट प्रवेश
- ऑलिंपिकमध्ये भारताला खरे, तर ऑलिंपिकसाठी दोन जागा
- भूपती - बोपण्णा आणि पेसच्या साथीत नवोदित खेळाडू असा प्रस्ताव
- एकच जोडी पाठवून दुसऱ्या जागेच्या मोबदल्यात सानिया मिर्झासाठी वाईल्ड कार्ड मिळविण्याचा प्रयत्न
- सानियाला वाईल्ड कार्ड प्रवेश मिळाल्यास ती एकेरी आणि मिश्र दुहेरी खेळू शकते
- सानियाच्या वाईल्ड कार्डचा निर्णय 28 जूनला
- मिश्र दुहेरीत केवळ सोळाचा "ड्रॉ' असल्यामुळे पदकाची अधिक संधी

काय होऊ शकते
- पेस ऑलिंपिक खेळणार हे निश्‍चित
- एकच जोडी पाठविण्यासाठी तडजोड करावी लागणार
- पेसच्या साथीत खेळण्यास विष्णू वर्धनचे पारडे जड
- भूपतीचे मन वळविण्यात यश मिळू शकते
- पेसच्या खेळण्यास तयार झाल्यास भूपतीला मिश्र दुहेरीत सानियाबरोबर खेळण्याची संधी
- भूपतीने नकार दिल्यास तो ऑलिंपिक खेळू शकणार नाही
- नियमानुसार मिश्र दुहेरी खेळण्यासाठी एकेरी किंवा पुरुष दुहेरी खेळणे आवश्‍यक
-भूपती न खेळल्यास मिश्र दुहेरीत पेस-सानिया खेळणार
- या सर्व संघर्षात रोहन बोपण्णाचा बळीचा बकरा होण्याची शक्‍यता


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: