Last Update:
 
क्रीडा

व्हिनस, क्‍लायस्टर्स यंदा बिगरमानांकित
प्रतिनिधी
Thursday, June 21, 2012 AT 12:35 AM (IST)
Tags: -
लंडन, ता. 20 ः पाच वेळची विजेती व्हिनस विल्यम्स आणि माजी विजेती किम क्‍लायस्टर्स यांना यंदाच्या वर्षी विंबल्डन स्पर्धेत मानांकन देण्यात आलेले नाही. गेल्या दहा वर्षांचा इतिहास बघता या दोघी खेळाडू प्रथमच स्पर्धेत बिगरमानांकित म्हणून खेळणार आहेत.
येत्या सोमवारपासून (ता. 25) सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी बुधवारी मानांकने जाहीर करण्यात आली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या नोव्हाक जोकोविच आणि मारिया शारापोवा यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. शारापोवा प्रथमच अव्वल मानांकित म्हणून या स्पर्धेत खेळेल.
महिलांची मानांकने डब्ल्यूटीएच्या क्रमवारीनुसार देण्यात आली आहेत. त्याचवेळी ग्रास कोर्ट लक्षात घेता पुरुष विभागात मानांकने देताना थोडाफार बदल झाला आहे.
अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सने 2000 ते 2009 या कालावधीत आठवेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. 1997 मध्ये या स्पर्धेत पदार्पण केल्यापासून पहिल्यांदीच ती बिगरमानांकित म्हणून खेळेल. जागतिक क्रमवारीत व्हिनस सध्या 55व्या स्थानावर आहे. क्‍लायस्टर्स 53व्या स्थानावर असून, ती देखील 2000 नंतर प्रथमच बिगरमानांकित म्हणून खेळेल. कारकिर्दीत तिने चार ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली आहेत.
जोकोविचनंतर रॅफेल नदाल, रॉजर फेडरर, अँडी मरे यांना मानांकन मिळाले आहे. महिलांमध्ये गतविजेती पेट्रा क्विटोवाला चौथे मानांकन मिळाले आहे.
व्हिनस बिगरमानांकित म्हणून खेळणार असली, तरी तिची बहीण सेरेनाला सहावे मानांकन मिळाले आहे. ग्रास कोर्टवरील या स्पर्धेत पुरुष विभागात मानांकने थोडीफार इकडे तिकडे झाली आहेत. जागतिक क्रमवारीत 27व्या स्थानावर असणाऱ्या बर्नार्ड टॉमिचला विसावे मानांकन मिळाले आहे. तीन वेळा उपविजेता ठरलेला अँडी रॉडीकला तिसावे मानांकन मिळाले आहे. अर्थात, जागतिक क्रमवारीत पंधराव्या स्थानावर असणाऱ्या फ्रान्सच्या गेल मोंफिल्सच्या माघारीमुळे रॉडिकला मानांकन यादीत स्थान मिळाले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: