Last Update:
 
क्रीडा

भारतीय महिला संघाची सुवर्ण लढत थायलंडशी
प्रतिनिधी
Thursday, June 21, 2012 AT 11:43 PM (IST)
Tags: -
हेयांग (चीन), ता. 21 ः तिसऱ्या आशियाई बीच क्रीडा स्पर्धेत कबड्डीत पुरुष विभागात भारताच्या वर्चस्वाला धक्का बसला. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे महिलांनी साखळीत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. सुवर्णपदकाच्या लढतीत उद्या त्यांची गाठ थायलंडशी पडेल.
भारतीय पुरुष संघासाठी आजचा दिवस अपयशाचाच ठरला. सुवर्णपदकाच्या शर्यतीत असणाऱ्या भारतीय संघाला साखळीतील अखेरच्या सामन्यात इराणकडून 42-32 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या उपांत्य लढतीत पाकिस्तानविरुद्ध पूर्वार्धात मिळविलेली (16-14) अशी दोन गुणांची आघाडी त्यांना टिकविता आली नाही. उत्तरार्धात पाकिस्तानच्या चढाईपटूंनी वेगवान खेळ करीत बाजी पलटविली. उत्तरार्धात पाकिस्तानने 18 गुणांची कमाई केली. भारताला चौदाच गुण मिळविता आले. पाकिस्तानने 32-30 असा निसटता विजय मिळविला.
महिला संघाने मात्र साखळीतील तीनही सामने जिंकत आघाडी मिळविली. अखेरच्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचे आव्हान 57-31 असे संपुष्टात आणले. तीन विजयांसह भारताचे सहा गुण झाले. सुवर्णपदकाच्या लढतीत आता त्यांची गाठ थायलंडशी पडेल. थायलंडचे तीन सामन्यांत चार गुण झाले. त्यांनी अखेरच्या लढतीत बांगलादेशाचा 51-37 असा पराभव केला. साखळीत झालेल्या लढतीत भारताने थायलंडवर 48-40 अशी मात केली होती.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: