Last Update:
 
क्रीडा

संघ निवडीत खेळाडूंनी ढवळाढवळ करू नये - विजयकुमार मल्होत्रा
प्रतिनिधी
Thursday, June 21, 2012 AT 11:42 PM (IST)
Tags: -
नवी दिल्ली, ता. 21 (पीटीआय) ः ऑलिंपिक स्पर्धेत भारताची कोणती टेनिस जोडी खेळणार, हे अजून निश्‍चित होत नसल्यामुळे भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) टेनिसपटूंवर टीका केली आहे.
"आयओए'चे हंगामी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी टीका करताना कुणाचे नाव घेतले नसले, तरी त्यांचा सगळा रोख महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांच्याकडे होता. ते म्हणाले, ""मला कुणा खेळाडूचे नाव घ्यायचे नाही; पण संघ आणि देशाचे हित लक्षात घेता कुठल्याही खेळाडूने संघ निवडीसाठी स्वतःची ताकद वापरू नये. खेळाडूंनी निवड प्रक्रियेत थेट ढवळाढवळ करणे हे देखील चूक आहे.''
ऑलिंपिकसाठी टेनिस जोडी ठरविण्याचा प्रश्‍न आला, तेव्हा भूपती आणि बोपण्णा यांनी आपण पेसच्या साथीत खेळण्यास तयार नसल्याचे संघटनेस कळविले होते. संघटनेने तोवर पेस आणि भूपती जोडी खेळणार, हे निश्‍चित केले होते. मात्र, खेळाडूंच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी निर्णय बदलून दोन जोड्या पाठविण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या या भूमिकेवरही मल्होत्रा यांनी टीका केली. खेळाडूंनी टाकलेल्या दबावाला संघटनेने बळी पडण्याचे काहीच कारण नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही बाजूंच्या अशा वर्तनामुळे वाईट प्रथा पडण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली.
मल्होत्रा म्हणाले, ""संघटनेने भूपती, बोपण्णाच्या इशाऱ्यासमोर झुकण्याचे काहीच कारण नव्हते. संघ निवडणे ही संघटनेची जबाबदारी आहे. आयओएने देखील यात ढवळाढवळ केली नाही. ही वाईट प्रथेची चटक अन्य महासंघांमध्ये लागू नये म्हणजे झाले. भारतीय क्रीडा संस्कृतीस ते घातक ठरेल.''


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: