Last Update:
 
क्रीडा

हंपीची युक्रेनच्या लान्होवर मात
प्रतिनिधी
Thursday, June 21, 2012 AT 11:42 PM (IST)
Tags: -
कझान (रशिया), ता. 21 ः भारताची ग्रॅंड मास्टर कोनेरू हंपी हिने कझान महिला ग्रांप्री बुद्धिबळ स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखत अन्य दोन खेळाडूंसह संयुक्त आघाडी मिळविली आहे. नवव्या फेरीत तिने महिलांच्या ब्लिट्‌झ प्रकारातील विश्‍वविजेती युक्रेनची केटेरिना लान्हो हिच्यावर मात केली.
कोनेरू, अर्मेनियाची एलिना डॅनिलियान आणि स्लोवेनियाची ऍना मुझिचिक या तिघी सहा गुणांसह संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत. दरम्यान, अर्मेनिया बुद्धिबळ महासंघाने दिलेल्या माहितीनुसार कोनेरू पहिल्या, एलिना दुसऱ्या, तर ऍना तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लिश ओपनिंग पद्धतीने झालेल्या लढतीत कोनेरू आणि लान्हो यांच्यात कडवा प्रतिकार झाला. अखेरीस मॅरेथॉन डावानंतर कोनेरूने 82व्या चालीला तिच्यावर मात केली.
स्पर्धेतील अजून दोन फेऱ्या शिल्लक असून, दहाव्या फेरीत तिची गाठ ऍलेक्‍झांड्रा कोस्टेनुईक आणि अकराव्या फेरीत अलिसा गिलिआमोवा हिच्याशी पडणार आहे. अखेरच्या दोन्ही फेऱ्यांतील प्रतिस्पर्धी तुलनेने दुबळ्या आणि विजेतेपदाच्या शर्यतीपासून दूर असल्यामुळे हंपीला विजेतेपदाची संधी आहे. तुलनेत डॅनिलियान हिला नवव्या फेरीत कोस्टेनुईककडून पराभव पत्करावा लागल्याने तिला आता विजेतेपदासाठी शिकस्त करावी लागेल. दहाव्या फेरीत तिच्यासमोर गॅलियामोवा हिचे सोपे आव्हान असले, तरी अखेरच्या फेरीत तिला विश्‍वविजेत्या यिफानशी खेळायचे आहे.
नवव्या फेरीचे निकाल ः
व्हिक्‍टोरिया मिलिटे (5.5) बरोबरी वि. ऍना मिझिचुक (6), नॅडेहडा कोसित्सेवा (4.5) बरोबरी वि. तातियाना कोसित्सेवा (4), अँटोअनेटा स्टिफानोवा (3.5) बरोबरी वि. बेतुल यिल्डिझ (2), केटेरिना लान्हो (4.5) पराभूत वि. कोनेरू हंपी (6), ऍलेक्‍झांड्रा कोस्टेनुईक (4.5) वि.वि. एलिना डॅनिलियान (6), अलिसा गिलियामोवा (2) पराभूत वि. होयू यिफान (5.5).


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: