Last Update:
 
माझे शहर

जुन्या रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी
Monday, August 27, 2012 AT 10:15 PM (IST)
Tags: goa
मडगाव, ता. 27 (प्रतिनिधी) ः गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून मडगावातील दक्षिण-मध्य रेल्वेच्या जुन्या स्थानकाकडे दुर्लक्ष होत आहे. गोवा सरकार व दक्षिण-मध्य रेल्वेच्या सहकाऱ्याने जुन्या रेल्वे स्थानकावर बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले होते, पण सध्या तेथे उभारण्यात येणारा मॉल प्रकल्प शीतपेटीत पडल्यातच जमा आहे. 

या मॉलसंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता व्यवस्थापनाकडे तीन वर्षांपूर्वी तसा प्रस्ताव आला होता, प्रकल्पाचे नियोजनही विचारात घेतले होते तथापि काही अपरिहार्य कारणामुळे तो मॉलचा प्रस्ताव पडून असल्याचे सांगण्यात आले. नंतर कोकण रेल्वे महामंडळाने दक्षिण-मध्य रेल्वेकडून जुन्या रेल्वे स्थानकाची जागा ताब्यात घेऊन स्थानकाचा विस्तार व विकास करण्याबरोबर निवासी गाळे उभारण्याचे नियोजन केले होते. जुन्या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणही करण्याचा त्यात समावेश होता. कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भानू तायल मागच्या वेळी गोव्यात आले असता त्यांनी जुन्या रेल्वे स्थानकाला झळाळी देण्याचे बोलून दाखविले होते. तथापि मडगावच्या जुन्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात अजूनपर्यंत एकाही प्रकल्पाचे नियोजन होत नसल्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. 

गोव्यात कोकण रेल्वेचे "ब्रॉडगेज' रूळ घालण्याच्या कामाला सुरवात झाल्यापासून दक्षिण-मध्य रेल्वेची वास्कोपासून लोंढापर्यंतची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानिमित्ताने मडगावच्या जुन्या रेल्वे स्थानकावरील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. ऑक्‍टोबर 1997 पासून कोकण रेल्वे सुरू झाली. नंतरच्या काळात मडगावचे जुने रेल्वेस्थानक कामकाजासाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले. जुन्या रेल्वे स्थानकाला कायमस्वरूपी टाळे ठोकले गेल्याने सभोवतालच्या परिसराला एकदम बकाल स्वरूप प्राप्त झाले असून सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

"गुडस्‌ शेड'च्या भागात मोठ-मोठी झुडपे वाढल्याने वाटमारी करणारे चोरटे दिवसाढवळ्या झुडपात लपून बसून कोणी एकटी व्यक्ती रुळावरून चालून जाताना दिसल्यास त्यांना लुबाडण्याचे सत्र सुरू आहे. 

या रेल्वे स्थानकाची सुमारे 40 हजारांहून अधिक चौरस मीटर जागा आहे. समोर असलेली "पोर्टर्स'च्या निवासी गाळ्यांची जागाही दक्षिण-मध्य रेल्वेची मालमत्ता आहे. जुन्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात सर्वत्र झाडे-झुडपे वाढलेली असून एखाद्या "हॉरर' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्थळ योग्य असल्याचे दिसते. या रेल्वे स्थानकाच्या परिसरात भटके तसेच चोरट्यांचे वास्तव्य असून येथे वेश्‍याव्यवसायही सुरू असतो. स्थानकाच्या परिसरात रात्रीच्या वेळी चोरटे धुमाकूळ घालीत असताना दिसतात. अनेकवेळा मालभाट स्टेशन रोडवरून कालकोंडा, शिरवडे, नावेलीला जाणाऱ्या लोकांना चोरट्यांनी जुन्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात अडवून वाटमाऱ्या केलेल्या आहेत. यापूर्वी येथे महिलांच्या अंगावरील सुवर्णालंकार पळवणे, चालत जाणाऱ्यांची पाकिटे, बॅगा पळवणे असे प्रकार घडलेले आहेत. चोरट्यांना कोणीही प्रतिकार केल्यास त्यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज पळवून नेल्याचे प्रकारही अनेकवेळा घडले आहेत. सध्या हे जुने रेल्वे स्थानक चोरटे व वेश्‍यांच्या वास्तव्याचा अड्डाच बनलेला आहे. 

या जुन्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात सध्या पदपूल उभारल्याने कालकोंडा, चिंचाळ, शिरवडे व नावेली भागातील लोकांना "शॉर्टकट' मार्ग तयार झालेला आहे. तथापि जुन्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीत दारुडे व वेश्‍या धिंगाणा घालीत असल्यामुळे महिला त्या मार्गाने जाणे टाळतात. या परिसरात असलेल्या वेश्‍यांना व चोरट्यांना हटविण्यात यावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. 


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: