Last Update:
 
माझे शहर

तारांकित मार्केटमध्ये शिस्त, स्वच्छतेचा अभाव
प्रतिनिधी
Tuesday, August 28, 2012 AT 10:45 PM (IST)
Tags: goa
पणजी, ता. 28 (प्रतिनिधी) ः एकेकाळी पणजीतील मुख्य मार्केटमध्ये जाणे नकोसे असायचे. ढकलाढकली, मार्केटमध्ये अंगावर उसळणारे घाणेरडे पाणी, कोंदट वातावरण अशी अवस्था होती. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या मागील कारकिर्दीत पणजीवासीयांना ऐसपैस, अत्याधुनिक सुरेख मार्केट प्रकल्प दिला. मार्केटची नवी नवलाई संपली आणि नंतर बेशिस्त, अस्वच्छतेचे पर्व सुरू झाले ते आजही संपलेले नाही.
महापालिकेचे मुख्य मार्केट म्हणजे आव जाव घर हमारा-तुम्हारा करून मार्केटमध्ये छोटासा कोपरा दिसला की घुसखोरीही होते, भांडण तंटेही होतात परंतु सगळे क्षणिक. तंटा, वाद महापौरांच्या कानावर घातला जातो परंतु समस्या सोडवायची झाल्यास दुसरा गट आक्रमक बनलेला असतो, त्या नादात मुख्य शिस्त, स्वच्छतेचा प्रश्‍न रेंगाळत राहातो. मार्केटची वेळोवेळी स्वच्छता, साफसफाई, पाण्याने धुलाई झाली तर मार्केट लखलखीत दिसते कारण मार्बल जागोजागी बसवले आहेत. पूर्वी एक दिवसाआड मार्केटमधील तळमजल्यावरील जा-ये करण्याच्या भूमीला पाण्याने आंघोळ घातली जायची परंतु अलीकडे वेळेवर इकडेतिकडे पडलेले कचऱ्याचे ढीग उचलले जातात हेच मोठे आहे असे भाजीविक्रेत्या महिला सांगतात. शहरी महापालिकेवर महापौर म्हणून एक महिला असल्यामुळे मार्केटमधील कचरा उचलण्याचे महिला कर्मचारीवर्ग काम वेळेवर करताना दिसतात. या कर्मचाऱ्यांबद्दल दुकानदार, भाजीविक्रेते, फूल, फळविक्रेत्यांची विशेष तक्रार नाही. मार्केटची एकदा रंगरंगोटी व्हायला हवी, पानाच्या पिचकाऱ्यांनी, तंबाखूने रंगलेल्या भिंती साफ व्हाव्यात असे व्यापारी, दुकानदार, भाजीविक्रेते, फळवाल्यांना वाटते. 

भिंती स्वच्छ झाल्या तरी त्या पुन्हा पानखाऊ रंगवणार नाहीत असे नव्हे परंतु कोनाड्यातील भिंती सांभाळायला हव्या आणि त्यासाठी त्या भिंतीवर येथे थुंकू नये, पिचकारी मारू नये असे फलक लावता येतील. तसे प्रयत्न आजवर फार कमी प्रमाणात झालेले दिसतात. या प्रयत्नांना यश येईल, असेही नाही परंतु मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून भिंतींवर रंगकाम करणाऱ्यांना रंगेहाथ पकडता येईल का, दंड आकारणी करता येईल का याचा विचार व्हायला हवा, असे व्यापाऱ्यांना वाटते. 

मार्केटमधील मासळी मार्केटनजीकच्या टॉयलेटची दुर्गंधी, गटारातून वाहणारे घाणपाणी आणि मार्केटची मुख्य जागा सोडून बाहेर होणारी मासळी विक्रेत्या, भाजीविक्रेत्या महिलांची गर्दी, त्या गर्दीतून काढली जाणारी वाहने मार्केटमध्ये येणाऱ्याला डोकेदुखी देऊन जाते. अलीकडे तर शहरात फिरून भाजीविक्री करणाऱ्या महिला भाजीविक्रेत्यांबरोबरीने बाजारातील कट्ट्यावर बसून भाजी, फळे विकणारे मार्केटच्या मागच्या, पुढच्या द्वारावर सकाळी 10.30 वाजेपर्यंत ठाण मांडतात. वाहनातून येणारे ग्राहक सोपेपणी मिळेल ते खरेदी करून जाते. आतल्या भागात नेमून दिलेल्या जागेत भाजी, फळ विक्री करणाऱ्यांपर्यंत ग्राहक त्यामुळे पोचत नाहीत, ग्राहकही मिळणे कठीण होते, व्यापार खराब होतो अशी तक्रार भाजीविक्रेती शेवंती करते. फळविक्रेता युवा व्यापारी लक्ष्मणचीही तीच तक्रार. दारात विक्री करणाऱ्यांना हटवा अशी वारंवार मागणी महापालिकेकडे होऊ लागली आहे परंतु त्यांचे काय करायचे? त्यांना कसे हाकलून लावायचे? हा प्रश्‍न महापालिकेला सतावतो आहे. 

महापालिकेचे निरीक्षक मार्केटमध्ये सोपो गोळा करण्यासाठी येतात, एखादी जादा टोपली मोकळ्या जागेत ठेवलेली दिसल्यास ती उचलतात परंतु बेकायदेशीरपणे मार्केटबाहेर वावरणाऱ्यांना कोणीही हटकत नाही, दम देत नाही, अशी शेवंती हिची खंत. आम्ही फक्त 131 होतो परंतु नवीन मार्केटमधील वाढलेले व्यापारी कोठून आले हा प्रश्‍न मलाही सतावतो अशी कबुली ती प्रांजळपणे देते. मार्केटला शिस्त यायला हवी, दिवसाला एकदा फरशीला पाणी लागायला हवे असे तिलाही वाटते. 

शिस्तीसाठी सहकार्य हवे
महापौर वैदेही नायक

मार्केटचा तिसरा टप्पा उभारण्यासाठी येत्या ऑक्‍टोबरमध्ये काम सुरू करण्याची योजना आहे. तत्पूर्वी मार्केटबाहेरील विक्रेत्यांसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. ते स्थानिक असल्यामुळे त्यांना आमची सहानुभूती असली तरी मार्केटमध्ये शुल्क भरणा करून विक्री करणाऱ्यांना त्रास होईल असे त्यांचे वर्तन असू नये तसेच 9.30 वाजेपर्यंतच या विक्रेत्यांना मार्केटबाहेर थांबून नंतर शहरात जावे असे त्यांना सांगण्यात आले असल्याची माहिती पणजीच्या महापौर वैदेही नायक देतात. कोणीतरी या सामान्य विक्रेत्यांना भडकावत असून त्यांना हटवण्यासाठी मार्केटमधील कायदेशीर विक्रेते मागे लागले आहेत, काही तरी उपाय करायलाच हवा, निरीक्षक किंवा पोलिस फौजफाट्याची तैनात करून विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवावे लागेल असे त्यांनी सांगितले. मार्केटमधील स्वच्छतेचा विषय ऐरणीवर आहे परंतु स्वच्छता केली तरी नंतर ती राखली जात नाही, स्वच्छतेचे धडे विक्रेत्यांना द्यायला हवे असे मत त्या व्यक्त करतात. मार्केटमध्ये स्वच्छता, शिस्तीचा अभाव असून त्यांत सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्केटमधील विक्रेत्यांचे सहकार्य हवे असे त्या सांगतात.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: