Last Update:
 
माझे शहर

नव्या मार्केट प्रकल्पामुळे डिचोलीच्या सौंदर्यात भर
प्रतिनिधी
Friday, August 31, 2012 AT 10:38 PM (IST)
Tags: goa
डिचोली, ता. 31 (प्रतिनिधी) ः डिचोली शहरातील वाढत्या लोकसंख्येचा व जुन्या बाजारपेठेतील गैरसोयींचा विचार करून तत्कालीन पालिका मंडळाने नव्या मार्केट प्रकल्पाचे नियोजन केले आणि आता हा मार्केट प्रकल्प पूर्णत्वास आलेला आहे. त्यामुळे डिचोलीतील बाजारपेठेचे महत्त्व वाढणार आहे. जुन्या मार्केटमध्ये काळाप्रमाणे अधिक सुविधा नव्हत्या आणि मार्केटला देखणेपणही नव्हते. नव्या विस्तारित प्रकल्पाने मात्र हे देखणेपण धारण केलेले आहे. आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता नव्याने उभा राहिलेला प्रकल्प मात्र अधिक देखणा आणि सुनियोजित असा आहे त्यामुळे डिचोलीच्या सौंदर्यात नव्याने भर पडणार असून सध्या डिचोलीवासीय या नव्या मार्केट प्रकल्पाच्या उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

डिचोली हे शहर महाराष्ट्राच्या सीमेलगत असल्याने पूर्वी या शहरात व्यापाराच्या दृष्टीने मोठे व्यवहार होत असत व त्यामुळे येथील बाजारपेठेचा विकासही होत गेला. पूर्वी बोर्डे - वडाचावाडा येथे डिचोलीची मुख्य बाजारपेठ होती. त्यानंतर आतील पेठ परिसरात नवी बाजारपेठ उभी राहिली. आतील पेठ आणि भायली पेठ या बहुतेक बाजाराचे व्यवहार होत असत. कालांतराने डिचोली शहराचा विकास होत गेला आणि बाजारपेठेचे स्थलांतर होत गेले. 

सध्या डिचोलीचे मार्केट तथा बाजारपेठ विकसित होत आहे. पूर्वी या ठिकाणी पालिकेचे फक्त मासे विक्रीचे मार्केट होते आणि काही किरकोळ गाळे होते. काही खासगी आस्थापनातून दुकाने थाटलेली होती. आज ही बाजारपेठ राहिलेली नाही. दुसरे मासे विक्री मार्केटही उभे राहिलेले आहे. तत्कालीन नगराध्यक्ष ऍड. रमेश सरदेसाई यांच्या कारकिर्दीत मार्केट विस्ताराची गरज लक्षात घेऊन डिचोली पालिकेच्या मार्केट विस्ताराच्या पहिल्या टप्प्याचे नियोजन झाले व कालांतराने हा प्रकल्प उभा राहिला. पण या ठिकाणी कुणी ग्राहक फिरकणार नाही अशी त्यावेळची काही गाळेधारकांची प्रतिक्रिया होती, पण आज ती फोल ठरत असून या मार्केट प्रकल्पाचा विस्ताराचा दुसरा टुमदार तथा भव्य असा (प्रकल्प) टप्पाही उभा राहिलेला आहे. कालांतराने मार्केटचा विकास होत आहे.
फिरत्या विक्रेत्यांची आणि भाजीपाला विक्रेत्यांची या बाजारपेठेत आता बरीच भर पडू लागलेली आहे. पूर्वी डिचोलीत भाजीपाल्याचे फक्त दोनच गाळे होते आज ही संख्या अगणित झालेली आहे. बुधवारच्या आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी तर यांचाच फार मोठा भरणा असतो आणि ही बाजारपेठ पूर्णपणे भरून जाते. अशी ही बाजारपेठ गजबजून जात असली तरी येथे शिस्तीचा मात्र मोठा अभाव जाणवत असतो. 

बाजारपेठेत हळूहळू सुधारणा घडवून आणत असताना डिचोली पालिका आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. उच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार पालिका क्षेत्रातील बरेच गाडे हटविण्यात आले. त्यांचे पुनर्वसन पालिका मार्केटमध्ये करण्यात आले पण त्यात नियोजन आणि सुव्यवस्थितपणा नसल्याने या मार्केटला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. हे गाळे कसेही थाटण्यात आलेले असल्याने त्यात सुसूत्रता अशी राहिलेलीच नाही. आता डिचोली मार्केटला देखणेपणा प्राप्त व्हावा यासाठी हे गाळे पुन्हा हटविण्यात येणार असून त्यांचे विस्तारित प्रकल्पात स्थलांतर करण्यात येणार आहे. या मार्केटमध्ये पार्किंगची आणि रस्ता रुंदीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रस्त्यालगत असलेले गाळेही पाडले जाणार असून मार्केटमधील हा रस्ता सुमारे दहा मीटर रुंद करण्याची योजना आहे. या पाडल्या जाणाऱ्या गाळ्यांचेही नव्या प्रकल्पात स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष नारायण बेतकेकर यांनी दिली. 

हा देखणा प्रकल्प सुमारे दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जागेत उभारण्यात आलेला असून प्रकल्प बांधकामासाठी सुमारे अडीच हजार चौरस मीटर जागा वापरण्यात आलेली आहे. उरलेल्या जागेत वाहनतळ, आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी फिरत्या व्यापाऱ्यांसाठी या जागेचा उपयोग करण्यात येणार असल्याचीही माहिती श्री. बेतकेकर यांनी दिली. 

या प्रकल्पाच्या पहिल्या मजल्यावरील सुमारे बावीस गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. हे गाळे सुमारे पंचवीस चौरस क्षेत्रफळ आकाराचे आहेत. कार्यालय, खासगी आस्थापने यासाठी या गाळ्यांचा वापर होऊ शकतो. यातूनही पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे. 

या प्रकल्पामुळे डिचोली पालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे पस्तीस लाख रुपयांची भर पडणार आहे. सध्या मार्केट सोपो कर पावणीतून दरवर्षी सुमारे दहा लाख रुपयांचा महसूल मिळत असतो. या प्रकल्पानंतर मार्केट विस्ताराचा तिसरा टप्पा हाती घेण्यात येणार आहे. यावेळी जुने मासे विक्री मार्केट आणि पुनर्वसन करण्यात आलेले गाळे पाडले जाणार असून या जागेत नवीन गाळे उभारण्याची आणि वाहनतळाची योजना आहे. हा नवीन प्रकल्प उभा राहिल्यानंतर फूल विक्रेत्यांना आणि इतरांना या जागेत सामावून घेतले जाणार असल्याचीही माहिती श्री. बेतकेकर यांनी दिली. 

पालिकेत मागे सत्तांतर झाल्यानंतर उभ्या राहिलेल्या मार्केट विस्तारित प्रकल्पाचा उद्‌घाटन सोहळा घाईगडबडीत आयोजित करण्यात आलेला होता व निमंत्रण पत्रिकांचेही वितरण करण्यात आलेले होते पण हा प्रकल्प पूर्णपणे उभा न राहिल्याने आणि काही तांत्रिक अडचणी असल्याने हा उद्‌घाटन सोहळा स्थगित करून लांबणीवर टाकण्यात आला. आता हा प्रकल्प गोवा राज्य नागरी विकास यंत्रणेने पालिकेच्या ताब्यात दिलेला असून बरेच काम पूर्ण करण्यात आलेले आहे. इतर सर्व कामे आणि सोपस्कार लवकरच पूर्ण होतील आणि येत्या गांधी जयंतीदिनी या प्रकल्पाचा उद्‌घाटन सोहळा होईल, अशी अपेक्षाही श्री. बेतकेकर यांनी व्यक्त केली. 
 
या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाल्यानंतर येथील पार्किंगची समस्या काही प्रमाणात कमी होईल व ग्राहकांचीही चांगली सोय होणार आहे. गाळ्यांचे भाडे सध्या गाळेधारकांना पालिका कार्यालयात येऊन भरावे लागते, पण यापुढे पालिका हे भाडे गाळेधारकाकंडे येऊनच गोळा करण्याची पालिकेची योजना असून ती येत्या दोन महिन्यात लागू केली जाईल असेही उपनगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
डिचोली पालिका मार्केटचा विस्तार होत असला तरी पालिकेचे गाळे भाड्याने घेतलेल्या गाळेधारकांसमोर मात्र गाळ्यांचा भाड्याची मोठी समस्या उभी राहिलेली आहे. पालिकेने पूर्वीचे करार रद्द करून नव्याने या भाड्यात भरमसाट वाढ केलेली आहे. ही वाढ कमी करावी यासाठी मार्केटमधील गाळेधारकांनी अनेक वेळा निवेदने सादर केली आणि संबंधित मंत्र्यांचीही भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली व या वेळी फक्त आश्वासनेच देण्यात आली पण अद्याप या गाळेधारकांना दिलासा दिलेला नाही. ही भाडेवाढ कमी करावी अशी या मार्केटमधील गाळेधारकांची मागणी आहे. पालिकेने आणि संबंधित खात्याने मार्केटचा विस्तार आणि विकास साधताना या गाळेधारकांच्या समस्यांचाही गांभीर्याने विचार करावा व सर्वांच्या विकासास हातभार लावावा, अशीही प्रतिक्रिया गाळेधारकांनी व्यक्त केली आहे.

जुन्या बाजारपेठेतील गाळेधारकांना
नव्या मार्केटमधील 56 गाळे

गोवा राज्य नागरी विकास यंत्रणेमार्फत सुमारे सात कोटी रुपये खर्चून हा देखणा मार्केट प्रकल्प उभा कलेला आहे. या प्रकल्पात मटण विक्री, मासे विक्री यांचे गाळे असून भाजीपाला विक्री करणाऱ्यांसाठी सुमारे शंभर स्टॉल्स उभारलेले आहेत. 

या प्रकल्पाच्या तळमजल्यावर सुमारे दोन बाय अडीच मीटर क्षेत्रफळाचे सुमारे 56 गाळे असून हे सर्व गाळे जुन्या गाळ्यांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहेत. या अंतर्गत त्यांच्या नावे गाळ्यांची नोंदणीही करण्यात आलेली असून काही गाळेधारकांनी फर्निचरचे कामही सुरू केलेले आहे. गाळ्यांचे स्थलांतर करण्याच्या नोटिसाही या संबंधित गाळेधारकांना देण्यात आलेल्या आहेत, पण सध्या गणेशचतुर्थी जवळ आल्याने सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांनी मुदत मागून घेतलेली आहे. पुनर्वसन करण्यात आलेल्या गाळेधारकांच्या भाड्यातही काहीशी वाढ करण्यात येणार आहे व लवकरच येथील बाजारपेठेचे व्यवहार सुरू होतील अशी अपेक्षा उपनगराध्यक्ष नारायण बेतकेकर यांनी व्यक्त केली.  


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: