Last Update:
 
माझे शहर

दूरचित्रवाहिन्यांच्या माऱ्यापुढे चित्रपटगृहांवर अवकळा
अग्रलेख
Thursday, September 06, 2012 AT 10:20 PM (IST)
Tags: goa
मडगाव, ता. 6 (प्रतिनिधी) ः एकेकाळी व्यावसायिक राजधानी असलेल्या मडगाव शहरात चित्रपट हे एक करमणुकीचे मोठे साधन होते. त्यावेळी चित्रपटगृहांना बरीच मागणी होती. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्या उत्सुकतेनेच प्रेक्षकांचे पाय चित्रपटगृहांकडे वळायचे, पण गेल्या दोन दशकांपासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विविध खासगी दूरचित्रवाहिन्यांच्या आगमनामुळे प्रेक्षकवर्गाने चित्रपटगृहांकडे पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांची स्थिती दिवसेंदिवस ढळत चालली आहे. मडगाव शहरात पोर्तुगीज काळापासून आतापर्यंत एकूण 13 चित्रपटगृहे सुरू झाल्याची नोंद आहे. त्यापैकी सिने लता, सिने विशांत तसेच अलीकडच्या काळात जुन्या बाजारातील ओशिया संकुलात सुरू झालेली "बॉलिवूड' व "हॉलिवूड' ही दोन मिळून एकूण 4 चित्रपटगृहे सुरू आहेत. इतर सर्व चित्रपटगृहांचे नामोनिशाण मिटलेले आहे.

मडगावच्या व्यावसायिक राजधानीत पोर्तुगीज काळात जुन्या रेल्वे स्थानकावर मवानी चित्रपटगृह, आबाद फारिया मार्गावर चित्रमंदिर, कोंब परिसरात म्हाळसा चित्रपटगृह ही चित्रपटगृहे होती. ती सगळी काळाच्या पडद्याआड गेली आहेत. टपाल कार्यालयासमोर "रेक्‍स' चित्रपटगृह होते. त्याजागी आता पालिका उद्यान उभे असून "रेक्‍स' चित्रपटाचे नामोनिशाण मिटलेले आहे. तसेच पोर्तुगीज काळात पालिका चौकातील "डेव्हिड हाऊस'जवळ पहिल्या मजल्यावर ऑलिंपिया चित्रपटगृह होते. आता त्या इमारतीचे व्यावसायिकरणात रूपांतर झाले असून सर्वत्र दुकाने थाटलेली आहेत. सिने ऑलिंपिया चित्रपटगृहाचे नामोनिशाण 4 दशकांपूर्वीच मिटलेले आहे. गोवा मुक्तिनंतरच्या काळात सिने लता, सिने विशांत, सिने मेट्रोपोल व सिने ब्लूपर्ल ही 4 चित्रपटगृहे सुरू झाली. परंतु "छोटा पडदा' प्रसिद्धीस उतरल्यानंतर ही चित्रपटगृहे प्रेक्षकांच्या अभावाने ओस पडू लागली. शहरात सध्या काही का असेना करमणुकीची साधने म्हणून सिने लता व सिने विशांत ही दोन चित्रपटगृहे सुरू आहेत. सिने मेट्रोपोल व सिने ब्लूपर्ल ही दोन चित्रपटगृहे प्रेक्षकवर्गाच्या अभावामुळे कायमस्वरूपी बंद पडलेली आहेत. सिने विशांत चित्रपटगृहाकडे लक्ष वेधले असता त्या चित्रपटगृहाचे व्यावसायिकीकरण झाले आहे. या चित्रपटगृहाचे दोन विभाग करण्यात आले आहे. एका भागात "स्क्रीन 1' व "स्क्रीन 2' अशी दोन चित्रपटगृहे सुरू केली आहेत. या चित्रपटगृहांना काही प्रमाणात प्रेक्षकांचा कल असलेला दिसतो. तर दर्शनी भागात "फॅब इंडिया'चा शोरूम थाटण्यात आला आहे. प्रेक्षकवर्गाने अलीकडच्या काळात चित्रपटगृहाकडे पाठ फिरविल्याने सिने विशांतच्या व्यवस्थापनाने चित्रपटगृह कम्‌ शोरूम सुरू करून चित्रपटगृहाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
मडगावात गेल्या दोन दशकांपूर्वी चित्रपटगृहांना प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती मेस्ताभाट परिसरात सिने ब्लू-पर्ल नावारूपास आले. हे चित्रपटगृह बरीच वर्षे चालले. नंतरच्या काळात व्यवस्थापनातील गैरव्यवहारामुळे सिने ब्लू-पर्ल अल्पावधीत बंद पडले. नंतर मालकाने चित्रपटगृहाची मालमत्ता एका बिल्डरला विकली. त्या बिल्डरने एकेकाळी प्रशस्त उभे असलेल्या सिने ब्लू-पर्लच्या जागी भव्य इमारत "शॉपिंग' संकुल सुरू केले आहे. अर्थात सिने ब्लू-पर्लचे नामोनिशाण मिटल्यातच जमा आहे. 

मडगावात पोर्तुगीज काळापासून सुरू असलेले सिने लता हे एकमेव चित्रपटगृह सध्या सुरू आहे. मात्र, चित्रपटगृहाची इमारत मोडकळीस आलेली आहे. तरी कामगार गटांतील प्रेक्षक जेमतेम प्रमाणात या चित्रपटगृहाकडे वळताना दिसत आहे. परप्रांतीय प्रेक्षकांवरच या चित्रपटगृहाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. एकंदर जुन्या चित्रपटगृहांकडे लक्ष वेधले असता प्रेक्षकांच्या अभावामुळे परिस्थिती बिकटच आहे. 

जुन्या बाजारातील दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाच्या मार्केट संकुलात गेल्या दशकात "बॉलिवूड" व "हॉलिवूड' ही दोन नवीन चित्रपटगृहे सुरू झाली असून या दोन्ही चित्रपटगृहांकडे बऱ्याच प्रमाणात प्रेक्षक वळताना दिसतात. पोर्तुगीज काळातील जुने सिने लता व सिने विशांत या दोन्ही चित्रपटगृहांच्या तुलनेत "बॉलिवूड' व "हॉलिवूड' ही दोन्ही चित्रपटगृहे सुस्थितीत असून प्रेक्षकवर्गाकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.

चित्रपट शौकीन सुरेंद्र पाणंदीकर
प्रेक्षकवर्ग पुन्हा चित्रपटगृहांकडे वळतोय ः सुरेंद्र पाणंदीकर
कोंब येथील सुरेंद्र पै पाणंदीकर हे चित्रपटांचे शौकीन आहेत. पोर्तुगीजकाळी व मुक्तिनंतरही ते चित्रपट बघण्यासाठी बेळगाव, मुंबईला जात होते. त्यावेळी दिवसाला तीन-तीन चित्रपट बघणे त्यांचा दिनक्रम होता. त्यांचे वडील कै. शांताराम पै पाणंदीकर हे नाटक व चित्रपटांचे शौकीन होते. ते मुलांना नाटके व चित्रपट बघण्यासाठी प्रत्येक रविवारी 4 आणे देत होते. वडिलांमुळे चित्रपट बघण्याची आवड निर्माण झाली. आतापर्यंत प्रदर्शित झालेला एकही चित्रपट त्यांनी पाहिल्याशिवाय सोडलेला नाही.
मडगावातील चित्रपटगृहांच्या माहितीबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला असता पोर्तुगीजकाळात सुरवातीला जुन्या रेल्वे स्टेशनवर मवानी चित्रपटगृह होते. मडगावचे तेच पहिले चित्रपटगृह होते. नंतर गोविंद चित्रमंदिर (आताचे गोमंत विद्यानिकेतन), रेक्‍स, ऑलिंपिया, म्हाळसा चित्रपटगृह (आताचे विद्या भुवन), नंतर सिने मेट्रोपोल, सिने विशांत, सिने लता व सिने ब्लू-पर्ल ही चित्रपटगृहे शहरात होती. त्यावेळी एक आणा, दोन आणे व सर्वांत महाग 4 आणे तिकीट दर होता. त्यावेळी चित्रपटांना प्रचंड गर्दी होत होती. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत प्रदर्शित झालेला चित्रपट गोव्यात येण्यासाठी 5 ते 6 वर्षांचा काळही लागत होता. त्यामुळे मित्रमंडळी मुंबई व बेळगावला जाऊन नवीन प्रदर्शित झालेले चित्रपट बघत होतो. त्यावेळी चित्रपटांचा दर्जा होता. आता सगळे "फॅशन' व "व्हल्गर' प्रकार चित्रपटात दाखविले जातात. कथांचेही "रिपिटेशन' असते. पूर्वीची गाणी मस्त असायची. कृष्णधवल चित्रपटही दर्जेदार असायचे. मध्यंतरी दूरदर्शन व छोट्या पडद्यांवरील चित्रवाहिन्यांच्या प्रसारणांमुळे चित्रपटांना उतरती कळा आली होती. तरी गेल्या तीन-चार वर्षांपासून चित्रपटगृहांकडे पुन्हा प्रेक्षकवर्ग वळू लागला आहे, असे त्यांनी सांगितले.

मडगावात सुरू झालेली चित्रपटगृहे

1) 1927 - गोविंद चित्रमंदिर (गोमंत विद्यानिकेतन)
2) 1932 - न्यू इम्पेरियल (विद्याभुवन)
3) 1933 - मवानी थिएटर (जुने रेल्वे स्टेशन)
4) 1945 - सिने ऑलिंपिया (सनशाईन बिल्डिंग)
5) 1945 - सिने रेक्‍स (पालिका उद्यान-आगाखान पार्क)
6) 1945 - सिने म्हाळसा (विद्याभुवन-नांव बदलले)
7) 1950 - सिने लता (जुने मासळी मार्केट)
8) 1954 - सिने मेट्रोपोल (हार्मोनिअम क्‍लब जवळ)
9) 1962 - सिने विशांत (आके-मडगाव)
10) 1975 - ब्लू-पर्ल (मेस्ताभाट-मडगाव)
12) 2004 - हॉलिवूड (ओशिया संकुल)
13) 2004 - बॉलिवूड (ओशिया संकुल) 


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: