Last Update:
 
देश-विदेश

भारत मधुमेहींचा देश होण्याचा धोका... : कीथ वाझ
प्रतिनिधी
Sunday, March 10, 2013 AT 11:52 PM (IST)
Tags: goa,   gomantak
पणजी, ता. 10 - गोव्याच्या मातीशी नाते असलेल्या अन गेली पंचवीस वर्षे लंडनच्या पार्लमेंटमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवलेल्या कीथ वाझ या पार्लमेंट सदस्याने भारतातील मधुमेहींची वाढती संख्या पाहून आपणही काही तरी करावे म्हणून ध्यास घेतला आणि मधुमेहींची तपासणी करणारी एक फिरती बसच भारतात उपलब्ध केली. गोव्यात ही बसगाडी या आठवड्यात विविध भागात फिरणार असून, मधुमेहाबाबत जनजागृती करण्याबरोबरच मधुमेही रुग्णांची तपासणीही करण्यात येणार आहे.
गोव्यात कळंगूट येथे प्रसिद्ध असलेल्या "टिटो रेस्टॉरंट'चे रिकार्डो डिसोझा यांच्याशी घरोब्याचे संबंध असलेल्या कीथ वाझ यांचे काल गोव्यात आगमन झाले. अन त्यांनी गोव्याच्या लोकांविषयी... येथील राहणीमानासंबंधी आणि एकूणच गोव्यातील वाढत्या मधुमेहासंबंधी चिंता व्यक्त केली.
इंग्लंडच्या लिसेस्टर भागाचे पार्लमेंट सदस्य म्हणून गेली पंचवीस वर्षे कीथ वाझ काम करीत आहेत. समाजसेवी वृत्ती अन लोकांप्रती असलेल्या प्रेमामुळे, विकासकामे करण्याची धडाडीची वृत्ती जोपासल्यामुळेच कीथ वाझ यंदा यूकेच्या पार्लमेंटमध्ये आपला रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. इंग्लंडच्या लेबर पार्टीशी निगडित छपन्न वर्षीय कीम वाझ हे सध्या यूकेचे गृह खात्याच्या समितीचे अध्यक्ष आहेत. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे कीथ वाझ यांची आई ही कळंगूट येथील आहे.
कळंगूट येथील टिटो बार अँड रेस्टॉरंटमध्ये कीथ वाझ यांच्याशी गप्पा करण्याचा योग आला, त्यातून त्यांच्या मनात गोमंतकीयांबद्दल असलेला आदर आणि प्रेम दिसून आले. विशेष म्हणजे कळंगूटचे आमदार मायकल लोबोही त्यांच्यासोबत होते. इंग्लंडमधील सिल्वरस्टार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खास भारतीय लोकांसाठी आणि त्यातल्या त्यात गोमंतकीयांसाठी मधुमेह तपासणी करण्यासाठी अद्ययावत सुविधांनी युक्त अशी बस पुरस्कृत करण्यात आली आहे. येथील अपोलो इस्पितळ प्रशासनाकडे हे फिरते रुग्णालय सध्या सुपूर्द करण्यात आले आहे. या फिरत्या रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर्स तसेच अन्य सहकारी कर्मचारी मधुमेही रुग्णांची तपासणी करतात, अन त्यांना मधुमेहींनी आपले जीवन कसे व्यतीत करावे याविषयी बहुमोल मार्गदर्शन करतात. हे सगळे विनाशुल्क..!
कीथ वाझ म्हणाले, बऱ्याचदा रुग्णाला माहीतच नसते की आपल्याला मधुमेह झाला आहे म्हणून..! आरोग्याप्रती अनास्था आणि दैनंदिन कामाच्या व्यस्त जीवनामुळे माणूस मधुमेह तपासणी करण्याचे पुढे ढकलतो. काही वेळा मी कशाला तपासणी करू, मला मधुमेहच झालेला नाही, असाही काही लोक दावा करतात, त्यामुळे शरीरात मधुमेहाचे वास्तव्य असूनही रुग्णाला ते समजत नाही. पुढे प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर मग धावपळ केली जाते.
कीथ वाझ पुढे म्हणाले, भारतात मधुमेही रुग्णांची बरीच मोठी आहे. अंदाजे 17 अब्ज लोक या रोगाने त्रस्त आहे. नजीकच्या काळात ही संख्या दुप्पट होण्याचा धोका आहे. मी तर असे म्हणेन की कला, संस्कृती क्षेत्रात इतर देशांपेक्षा सरस असलेला भारत हा मधुमेहींचा देश म्हणूनही प्रसिद्ध होऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच काळजी घ्यायला हवी. गोव्यात मधुमेह रोगासंबंधी येथील सरकारचे कार्य उल्लेखनीय आहे. राज्य सरकारने उपलब्ध केलेल्या विविध आरोग्य सुविधांवरूनच आणि इस्पितळांवरून हे अनुमान कुणीही करू शकतो. मात्र ग्रामीण भागातील लोकांना मधुमेहाचे महत्त्व कळले पाहिजे. मधुमेह रोग होऊ नये आणि झाला तर कोणती काळजी घेतली पाहिजे, याचे योग्य मार्गदर्शन ग्रामीण भागातील लोकांना व्हायला हवे. त्यासाठी आपण ही मधुमेह रुग्ण तपासणी करणारी बसगाडी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या बसगाडीचा योग्य लाभ गोमंतकीयांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: