Last Update:
 
देश-विदेश

"सोनसोडो' सल्लागारपदी असनानी यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब
प्रतिनिधी
Monday, March 11, 2013 AT 11:44 PM (IST)
Tags: margoa,   goa,   gomantak
मडगाव, ता. 11 - मडगाव पालिकेच्या सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून हैदराबादचे कचरा तज्ज्ञ यू. एन. असनानी यांची नियुक्ती करण्याचा अंतिम निर्णय पालिकेच्या खास बैठकीत आज घेण्यात आला. सोनसोडोत कचरा यार्डात फोमेंतो रिसोर्सिसतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात सल्लागार व प्रशासनाचे ते काम पाहणार आहेत. पालिकेतर्फे त्यांना 17 लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी दिली.
फोमेंतो रिसोर्सिस कंपनीतर्फे सोनसोडो यार्डात कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केल्यानंतर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागार म्हणून श्री. असनानी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि पालिकेत नवीन मंडळ आल्याने त्यांच्या शुल्काचा आढावा घेतला व त्यांना मोठ्या प्रमाणात शुल्क द्यावे लागत असल्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द केली. त्याचप्रमाणे काही नगरसेवकांनी त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. त्यानंतर पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पावर तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे पटवून दिली. त्यामुळे पालिका मंडळाने आज खास बैठक बोलावून पुन्हा श्री. असनानी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली.
कचरा तज्ज्ञ सल्लागार श्री. यू. एन. असनानी यांना लवकरच बोलावून घेऊन आधी त्यांच्याशी शुल्क व कामाच्या जबाबदारीबाबत करार करून घेतला जाणार आहे. सोनसोडोत फोमेंतो रिसोर्सिसतर्फे उभारण्यात आलेल्या संबंध कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचे ते काम पाहणार आहेत. प्रकल्पाचे "ऑपरेशनल" काम व खर्चाच्या "बिलिंग"चे कामही तेच पाहणार असल्याचे नगराध्यक्ष श्री. सिल्वा यांनी सांगितले.

अडवलेले शुल्क द्यावेच लागणार

हैदराबादचे कचरा तज्ज्ञ सल्लागार श्री. यु. एन. असनानी यांनी सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पात सुरवातीपासून काम केले आहे. यापूर्वीच्या कामाचे शुल्क त्यांना अद्याप मिळालेले नाही. पालिकेतील काही नगरसेवकांनी त्यांच्या शुल्काची रक्‍कम मोठी असल्याने आक्षेप घेतला होता. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मध्यंतरी त्यांच्या शुल्काच्या रकमेचा धनादेश काढून नगराध्यक्षांकडे पाठवला, तरी नगराध्यक्षांनी त्यांचा धनादेश अडवून ठेवला. पालिकेला त्यांच्या पूर्वीच्या कामाचे शुल्क द्यावेच लागणार आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: