Last Update:
 
देश-विदेश

चित्रपटसृष्टीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त इएसजीतर्फे प्रभात चित्रपट महोत्सव
प्रतिनिधी
Monday, March 11, 2013 AT 11:43 PM (IST)
Tags: films,   goa,   g0mantak
पणजी, ता. 11 - गोव्यात येत्या 15 ते 19 मार्च दरम्यान होणाऱ्या प्रभात चित्रपट महोत्सवात पुरस्कारप्राप्त कुंकू, शेजारी, रामशास्त्री, माणूस, संत तुकाराम हे सामाजिक आशयावरील पाच चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. सर्व चित्रपट माकनिझ पॅलेसमध्ये दाखवले जाणार आहेत.
गोवा मनोरंजन सोसायटीने प्रभात फिल्मस कंपनीच्या संयुक्त विद्यमाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रभातच्या प्रसिद्ध चित्रपटांचा महोत्सव आयोजित केला आहे. मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष आमदार विष्णू वाघ व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद लोलयेकर यांनी ही माहिती आज येथे पत्रकार परिषदेत दिली. इतर चित्रपटांबरोबरच व्ही. शांताराम यांचे शेजारी, कुंकू, माणूस हे तीन चित्रपट महोत्सवात दाखवले जातील. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते येत्या शुक्रवार 15 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होईल व त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला पहिला भारतीय चित्रपट असा मान मिळवलेला "संत तुकाराम' दाखवला जाणार आहे.
या महोत्सवाच्या दरम्यान येत्या 17 मार्च रोजी प्रादेशिक सिनेमा समोरची आव्हाने या विषयावरील चर्चासत्र होणार असून, चित्रपट समीक्षक, लेखक इसाक मुजावर, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक दिलीप बापट, दिग्दर्शक व निर्माते राजेंद्र तालक, निर्मात्या डॉ. प्रमोद साळगावकर, दिग्दर्शक ज्ञानेश मोघे हे सहभाग घेणार आहेत. पत्रकार परिषदेस मनोरंजन सोसायटीचे सर व्यवस्थापक श्रीपाद नाईक होते.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: