Last Update:
 
देश-विदेश

"दिगंत' चालला "कान्स'ला!
प्रतिनिधी
Tuesday, March 12, 2013 AT 11:24 PM (IST)
Tags: films,   goa,   g0mantak
भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड; पहिलाच गोमंतकीय चित्रपट

पणजी, ता. 12 : गोमंतकीय चित्रपट "दिगंत' आता कान्स चित्रपट महोत्सवात झळकणार असून, नवी दिल्ली येथील चित्रपट महोत्सव संचालनायाद्वारे भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. या निवडीनंतर कान्समध्ये झळकणारा हा पहिलाच गोमंतकीय चित्रपट ठरला आहे.
व्हिन्सन ग्राफिक्‍सचे संजय शेट्ये हे या चित्रपटाचे निर्माते असून, दिग्दर्शन ज्ञानेश मोघे यांचे, तर लेखन प्रसाद लोलयेकर यांनी केले आहे. राजेश पेडणेकर, दीपा मोघे, प्रणव भिसे, समीक्षा देसाई आणि राजू नाईक यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही "दिगंत'चे इंडियन पॅनोरमात प्रदर्शन झाले होते व त्याला प्रेक्षक, समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्याशिवाय मागील मुंबईतील "मामी' चित्रपट महोत्सवातही भारतीय विभागातही हा चित्रपट दाखवण्यात आला होता.
आता या चित्रपटाची "कान्स'साठी निवड झाल्यानंतर दिग्दर्शक ज्ञानेश मोघे यांनी आनंद व्यक्‍त केला आहे. एवढे मोठे व्यासपीठ चित्रपटाला मिळणे हे अभिमानास्पद आहे. आम्ही एक साधी व वास्तवदर्शी कथा मांडण्याचा आणि ती जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला एवढ्या मोठ्या स्तरावर पसंती मिळाली, हे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटाचे निर्माते संजय शेट्ये यांनीही गोमंतकीय चित्रपटसृष्टीसाठी हे अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट पाहताना अनेकांनी आपल्या संवेदनांना चित्रपटाने हात घातल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसेच समाजाच्या विविध स्तरातील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला पसंती मिळाली, हेच चित्रपटाचे यश असल्याचे ते म्हणाले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: