Last Update:
 
देश-विदेश

"चुकलो असलो, तरी कारवाई कठोर'
प्रतिनिधी
Wednesday, March 13, 2013 AT 12:53 AM (IST)
Tags: goa
सिडनी, ता. 12 ः शिस्तभंगाच्या कारवाई प्रकरणी संघातून वगळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन याने मायदेशी परतताच विमानतळावर आपण चुकल्याची कबुली दिली. मात्र, त्यासाठी झालेली शिक्षा खुपच कठोर असल्याचे देखील त्याने सांगितले. 

भारतातील एकूण कारवाई संदर्भात बोलताना वॉटसन म्हणाला,""प्रशिक्षकांनी अपयशाची कारणमीमांसा करण्यास सांगितल्यानंतरही मी चालढकल केली. मी शंभर टक्के चूक आहे. पण, म्हणून त्यासाठी थेट संघातून निलंबनाची कारवाई खरंच खूप कठोर होती. ती स्विकारणे देखील मला कठीण गेले.''
शिस्तभंगाची कारवाई म्हणून मला वगळण्यात आले याची कल्पनाच मी करू शकत नाही. या कारवाईने मी उध्वस्त झालो आहे. तो म्हणाला,""इतर खेळाडूंनी ज्या प्रमाणे सादरीकरण केले. ते मला देखील करता आले असते. पण, मी ते केले नाही. त्याची शिक्षा मला मिळाली. कारवाईचे स्वरुप बघून मी उध्वस्तच झालो. अर्थात, त्यांना योग्य वाटले म्हणूनच त्यांनी कारवाई केली.''

या कारवाईनंतर कर्णधार मायकेल क्‍लार्कबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना कधीडी तडा जाणार नाही, असे देखील त्याने सांगितले. तो म्हणाला,""क्‍लार्क माझा चांगला मित्र आहे. माझ्यावर झालेली कारवाई ही संघ व्यवस्थापनाचा एक भाग आहे. आमची मैत्री यापुढेही कायम राहिल.''

वॉटसनने या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख पॅट होवार्ड यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हॉवर्ड यांनी वॉटसन कधीच संघाचा भाग बनून राहात नाही, असे वक्तव्य केले होते. वॉटसन म्हणाला,""हॉवर्ड यांना पदभार स्विकारून आता कुठे दीड वर्ष होत आहे. मी ज्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो तेच याविषयी अधिकारवाणीने बोलू शकतात. त्यांच्या वक्तव्याने मी निराश झालो.''

कारवाई योग्यच ः क्रिकेट ऑस्ट्रेलिया
भारतात ऑर्थर गुरुजींनी उगारलेल्या बडग्याची ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी खिल्ली उडविली असली, तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिले आहे. संघात शिस्त हवीच. तुम्ही संघाचे होऊ शकत नाहीत, तर खेळूही शकत नाही. केवळ मैदानावर एकत्र म्हणजे संघ होत नाही. प्रत्येकवेळी तुम्ही संघाबरोबर असणे आवश्‍यक असते, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांनी टेलीकॉन्फरन्सद्वारे संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांनी निर्धास्त राहण्यास सांगितले.
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाईचे समर्थन केले असले, तरी चौथ्या कसोटी साठी आता संघ व्यवस्थापनासमोर निवडीसाठी केवळ 13 खेळाडू शिल्लक राहिले आहेत. 


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: