Last Update:
 
क्रीडा

ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 75 धावा
प्रतिनिधी
Sunday, March 17, 2013 AT 07:58 PM (IST)
मोहाली - मोहाली कसोटी सामन्यात आज (रविवार) चौथ्या दिवशी शिखर धवनला द्विशतक पूर्ण करण्यात अपयश आले असले तरी मुरली विजयने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकाविले आहे. त्यानंतर आलेल्या भारतीय फलंदाजांना मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा पहिला डाव 499 धावांवर संपुष्टात आला. भारताने ऑस्ट्रेलियावर 91 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 3 बाद 75 धावा केल्या आहेत. 

आज सकाळच्या सत्रात शिखर धवनने द्विशतक पूर्ण करावे, अशी क्रिडाप्रेमींची इच्छा होती. पण, तो १८७ धावांवर असताना लिऑनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही फार काळ टिकला नाही. तो अवघ्या दोन धावांवर सीडलच्या गोलंदाजीवर बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि मुरली विजय यांनी संघाच्या धावसंख्येत वाढ केली. त्या दरम्यान मुरली विजयने चौकार खेचत कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. या मालिकेतील विजयचे हे दुसरे शतक आहे. परंतु, मुरली विजयही द्विशतकापासून दूर राहिला. त्यानंतर कोणताही भारतीय फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. 499 धावांवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 3 बाद 75 धावा केल्या आहेत.

त्यापूर्वी, तिसऱ्या दिवशीच्या खेळाला हजर असलेल्या प्रेक्षकांकडून करमणूक कर वसूल करायला काहीच हरकत नाही. दिवसभराच्या खेळात 408 धावा आणि त्यासुद्धा कसोटी सामन्यात फार क्वचित बघायला मिळतात. ऑस्ट्रेलिया संघाने 400 धावांचा टप्पा गाठताना केलेल्या आक्रमक फलंदाजीला भारतीय फलंदाजांनी त्याच्यापेक्षा सडेतोड उत्तर दिले. मुरली विजय आणि शिखर धवनने सलामीला केलेली नाबाद 283 धावांची भागीदारी अमूल्य ठरली आणि सगळ्यांच्या तोंडात फक्त शिखर धवनच्या अफलातून शतकी खेळीची स्तुतिसुमने होती. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उभारलेल्या 408 धावांना उत्तर देताना भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या दिवसअखेरीला बिनबाद 283 धावांचा टप्पा ओलांडल्याने मायकेल क्‍लार्कची झोप काळजीने उडणार आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शिखर धवन 185 आणि विजय 83 धावांवर खेळत होते.

स्टीव्हन स्मिथ आणि मिचेल स्टार्कने 97 धावांची भागीदारी रचल्याने दिवसाच्या खेळाची सूत्रे ऑस्ट्रेलियाच्या हाती गेली. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने चांगल्या फलंदाजाला लाजवेल अशी फटकेबाजी केली. दुर्दैवी स्टार्क 99 धावांवर इशांत शर्माच्या चेंडूवर बाद झाला, तरीही ऑस्ट्रेलियाच्या धावफलकाने 400 धावांचा लक्षणीय टप्पा ओलांडलाच. इशांत शर्मा आणि जडेजाने प्रत्येकी तीन, तर ओझा आणि अश्‍विनने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. चांगली धावसंख्या पाठीशी उभी राहिल्याने ऑसी गोलंदाजांच्या चेहऱ्यावर आशेची चमक दिसली.

भारतीय फलंदाजांना अडचणीत आणायच्या मोठ्या आशेने उपाहारानंतर मैदानात उतरलेल्या मायकेल क्‍लार्कच्या गोलंदाजांचे शिखर धवनने हसे केले. समोर आलेल्या प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवताना शिखर धवनने चौकार मारायची शर्यत लावली. डोहर्टीच्या एकाच षटकात चार चौकारांसह 18 धावा धवनने वसूल केल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने अजिबात हवेतून फटका मारला नाही. फिरकी गोलंदाजांना त्याचे पदलालित्य सुंदर होते. धवन जमिनीलगत फटके मारत असताना विजयने नाथन लियॉनला दोन उत्तुंग षटकार मारले. मायकेल क्‍लार्कला क्षेत्ररचना पांगवावी लागली, ज्याने सहजी एकेरी धावा दोघा फलंदाजांना मिळू लागल्या.

शिखर धवनने 85 चेंडूंत 21 चौकारांसह शतक पूर्ण केल्यावर भारतीय संघातील सर्व खेळाडू हात वर करून मनापासून हसत त्याला दाद देत होते. सेहवाग गेल्यावर काय होणार, अशी चिंता वाटत असताना शिखरचे अफलातून शतक म्हणजे पानगळीनंतर झाडावर आलेली ताजी पालवी वाटली. विजय-शिखरने भागीदारीचे द्विशतक साजरे करताना गावसकर-चेतन चौहान यांचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा 192 धावांच्या सलामीचा विक्रमही मागे टाकला.

शतकानंतर शिखर थांबला नाही त्याने परत नव्याने "गार्ड' घेऊन नवी खेळी चालू केली. क्‍लार्कने सहा गोलंदाजांना भागीदारी तोडायची संधी दिली. धवन-विजयची जोडी गोलंदाजांना दाद देत नव्हती. अगदी खरे सांगायचे तर गोलंदाज धवनच्या तडाख्यांना इतके भेदरले, की त्यांनी चहापानानंतर शिखरला सोप्या चेंडूंचे नजराणे पेश केले. दोघा फलंदाजांनी षटकामागे 5 धावांची सरासरी ठेवत 283 धावा जमा केल्या. चौथ्या दिवशी धावांचा हाच धडाका पुढे चालू राहिला तर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ वर्चस्व गाजवून निकाल लावण्याची कमाल करू शकतो.

धावफलक आणि शिखर धवन आकडेवारी

धावफलक
ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव ः
एड कॉवन झे. कोहली गो. अश्‍विन 86
डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. जडेजा 71
मायकेल क्‍लार्क यष्टिचीत धोनी गो. जडेजा 0
फिल ह्यूज झे. धोनी गो. ओझा 2
स्टीव स्मिथ यष्टिचीत धोनी गो. ओझा 92
(185 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार)
ब्रॅड हॅडिन त्रि. गो. इशांत 21
मोझेस हेन्रिकेज त्रि. गो. इशांत 0
पीटर सिडल पायचीत गो. जडेजा 0
मिशेल स्टार्क झे. धोनी गो. इशांत 99
(144 चेंडू, 14 चौकार)
नॅथन लियॉन नाबाद 9
झेव्हियर डोहर्टी पायचीत गो. अश्‍विन 5
अवांतर 23
एकूण 141.4 षटकांत सर्वबाद 408
बाद क्रम ः 1-139, 2-139, 3-151, 4-198, 5-244, 6-244, 7-251, 8-348, 9-399
गोलंदाजी ः
भुवनेश्‍वर कुमार 9-0-44-0
इशांत शर्मा 30-8-72-3
आर. अश्‍विन 43.5-9-97-2
प्रग्यान ओझा 28-5-98-2
रवींद्र जडेजा 31-7-77-3

भारत ः पहिला डाव ः
मुरली विजय 153 धावा
शिखर धवन 187 धावा
चेतेश्वर पुजारा 1 धाव
सचिन तेंडुलकर 37 धावा
विराट कोहली 67 धावा
महेंद्रसिंह धोनी 4 धावा
रविंद्र जडेजा 8 धावा
आर. अश्विन 4 धावा
भुवनेश्वर कुमार 18 धावा
ईशांत शर्मा 0 धावा
प्रग्ना ओझा 1 धाव

अवांतर 19

गोलंदाजी
मिशेल स्टार्क 23-5-74-2
पीटर सिडल 29.1-9-71-5
मोझेस हेन्रिकेज 15-1-62-1
नॅथन लियॉन 31-4-124-1
झेव्हियर डोहर्टी 24-8-87-0
स्टीव स्मिथ 10-0-63-1

ऑस्ट्रेलिया ः दुसरा डाव ः
डेव्हिड वॉर्नर 2 धावा
एड कॉवन 8 धावा
फिल ह्यूज (खेळत आहे) 53 धावा
स्टीव स्मिथ 5 धावा
नॅथन लियॉन (खेळत आहे) 4 धावा

धवनचे विक्रमी "शिखर'
- 50 चेंडूंत 50. 85 चेंडूंत 100. 131 चेंडूंत 150
- पदार्पणात सर्वांत वेगवान शतक करणारा धवन आता पहिला कसोटीपटू. वेस्ट इंडीजच्या ड्‌वेन स्मिथचा विक्रम मोडला.
- स्मिथने जानेवारी 2004 मध्ये केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात 93 चेंडूंत 100 धावा केल्या होत्या
- पदार्पणात शतक करणारा शिखर धवन भारताचा पहिला सलामीवीर (याअगोदर केसी इब्राहिम यांनी पदार्पणात सलामीला खेळताना नवी दिल्लीत 1948 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 85 धावांची सर्वाधिक खेळी केली होती) 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: