Last Update:
 
देश-विदेश

डॉ. मनमोहनसिंग राजीनामा द्या - भाजप
प्रतिनिधी
Monday, March 18, 2013 AT 10:19 PM (IST)
Tags: -
नवी दिल्ली, ता. 18 ः कोळसा महाघोटाळा घडतानाच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे त्याच खात्याचे मंत्री असल्याने डॉ. सिंग यांनी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी आज भाजपने राज्यसभेत केली. संसदेच्या पटलावरून पंतप्रधानांचा राजीनामा प्रमुख विरोधी पक्षाने प्रथमच मागितला आहे. दुसरीकडे, द्रमुक व सप या मित्रपक्षांशी संबंध ताणले गेल्याने "यूपीए' सरकारची उलटगणती सुरू झाली आहे, असे भाकीतही भाजपने वर्तवले आहे.
"कोलगेट'प्रकरणी हंसराज अहिर यांच्याबरोबरीने सरकारच्या विरोधात किल्ला लढविणारे प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल केला. त्याआधी प्रश्‍नोत्तराच्या तासात याबाबत जावडेकर यांनी भाजप नेत्यांच्या कानाला लागून काही चर्चा केली. तेथून "ग्रीन सिग्नल' मिळाल्यावर जावडेकर यांनी तुफान टोलेबाजी केली. ते म्हणाले, की "कोलगेट'प्रकरण अत्यंत गंभीर आहे कारण यात देशाच्या मौल्यवान संपत्तीची
वाट लावण्यात आली आहे. तब्बल 51 लाख कोटी रुपये किमतीच्या कोळसा खाणी 104 कंपन्यांना सरकारने फुकटात वाटून टाकल्या. यासाठी लिलावही पुकारला नाही. ज्यांना कोळसा खाणी दिल्या त्या का दिल्या? किंवा ज्यांना दिल्या नाहीत त्यांना का दिल्या नाहीत?, याचाही खुलासा नाही. हा घोटाळा घडला तेव्हा म्हणजे 2006 ते 2009 या कालावधीत खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच कोळसा खात्याचे मंत्री होते. त्यामुळे या महाघोटाळ्याची जबाबदारी घेऊन त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.
दरम्यान, भाजप नेते वेंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्प व वित्त विधेयकावरील चर्चेतही सरकारचे वाभाडे काढले. देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार कर्ज घेणार की आणखी नोट छापणार?, या साध्या प्रश्‍नाचे उत्तर अर्थसंकल्पातून मिळत नाही, असा हल्ला नायडू यांनी चढविला. संसदेतील इतक्‍या महत्त्वाच्या चर्चेसाठी खुद्द अर्थमंत्रीच सदनात उपस्थित नाहीत याबद्दल संताप व्यक्त करून नायडू म्हणाले, की या सरकारचे आर्थिक धोरणात काहीही सातत्य नाही. देशाची अर्थव्यवस्था गंभीर संकटात आहे. मात्र, सरकार संसदेबाबतच गंभीर नाही. अर्थसंकल्प मांडताना भारदस्त शब्दांची कल्हई करून गोंधळ टाळला म्हणजे तो अर्थसंकल्प चांगला असतो, असे नाही.
महागाई कमी करण्यासह भ्रष्टाचार व विदेशातील काळा पैसा या मुद्यांवरही सरकार पूर्णपणे नापास झाले आहे, असा शेराही त्यांनी मारला. 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: