Last Update:
 
देश-विदेश

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा झेंडा
नारायण गावस, मोर्ले कॉलनी-सत्तरी
Monday, March 18, 2013 AT 10:16 PM (IST)विक्रम गोखले, आरती अंकलीकर-टिकेकर, संजय लोटन पाटील, उषा जाधव, शैलेंद्र बर्वे मानकरी

नवी दिल्ली- भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा मराठीची मोहर उमटली असून, सर्वोत्कृष्ट अभिनेता (विक्रम गोखले ः चित्रपट "अनुमती'), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (उषा जाधव ः धग) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (संजय लोटन पाटील ः धग) यांनी पुरस्कार पटकावले आहेत. आरती अंकलीकर-टिकेकर यांना "संहिता' या मराठी चित्रपटातील "पलके ना मोडो...' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायिकेचा पुरस्कार; तर शैलेंद्र बर्वे यांना याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान तिग्मांशू धुलियादिग्दर्शित "पानसिंग तोमर' या परिस्थितीमुळे धावपटूचा डाकू बनलेल्या खेळाडूची सत्यकथा सांगणाऱ्या चित्रपटाला मिळाला असून, याच चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार इरफान खान याला विक्रम गोखले यांच्याबरोबर विभागून मिळाला. देशभरात प्रदर्शित 14 भाषांतील 38 चित्रपटांमधून या चित्रपटांची निवड करण्यात आल्याची माहिती बासू चटर्जी, अरुणा राजे व स्वपन मुळीक यांनी सोमवारी दिली.

छोट्याशा गावातील स्मशानात प्रेते जाळण्याचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या "धग' या मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. या गरीब कुटुंबाची ससेहोलपट परिणामकारकपणे मांडणाऱ्या संजय लोटन पाटील या तरुण दिग्दर्शकाने मानाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवत मराठीचा झेंडा उंच फडकावला आहे; तर या चित्रपटामध्ये या कामाची संसाराला बसलेली धग यशस्वीपणे थोपविणाऱ्या पत्नीची भूमिका करणाऱ्या उषा जाधवने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला आहे.

"विकी डोनर' व मल्याळम चित्रपट "उस्ताद हॉटेल' यांनी सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपटाचा पुरस्कार मिळवला असून, "विकी डोनर'मधील भूमिकेसाठी अन्नू कपूर यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता व डॉली अहलुवालियाला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. डॉलीला हा पुरस्कार कल्पना या मल्याळम अभिनेत्रीबरोबर विभागून मिळाला आहे. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हिंदी चित्रपट "चितगाव' व मल्याळम चित्रपट "101 चोडीयांगल'ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार वीरेंद्र प्रताप (देश इंडिया सर्कस) व मिनन (101 चोडीयांगल) यांना विभागून देण्यात आला.

इतर पुरस्कार
  • नृत्यदिग्दर्शन ः पंडित बिरजू महाराज (विश्‍वरूपम)
  • गीत ः प्रसून जोशी (बोलो ना, चित्रपट चितगाव)
  • पटकथा ः सुजय घोष (कहाणी)
  • गायक (पुरुष) ः शंकर महादेवन (चितगाव)
  • आधारित पटकथा ः भावेश मंडालिया व उमेश शुक्‍ला (ओ माय गॉड)
  • सामाजिक समतेसाठीचा नर्गीस दत्त पुरस्कार ः उस्ताद हॉटेल
  • सामाजिक चित्रपट ः स्पिरीट (मल्याळम)
  • पर्यावरण चित्रपट ः ब्लॅक फॉरेस्ट (मल्याळम)
  • बालचित्रपट ः देख इंडिया सर्कस
  • विशेष ज्युरी पुरस्कार ः तलाश, गॅंग्ज ऑफ वासेपूर, कहाणी, देश इंडिया सर्कस व चित्रांगदा (बंगाली).


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: