Last Update:
 
देश-विदेश

सुप्रीम कोर्टा'चा आदेश बंधनकारक - भारताने इटलीला कळविले; वटहुकूम अंमलबजावणीचे सूतोवाच
प्रतिनिधी
Monday, March 18, 2013 AT 10:20 PM (IST)
Tags: -
नवी दिल्ली, ता. 18 ः इटलीने भारताला दिलेल्या निवेदनात व्हिएन्ना करारानुसार राजदूत आणि राजनैतिक प्रतिनिधींना असलेल्या विशेष संरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला असला, तरी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पालनाचे बंधनही सरकारवर असल्याची बाब इटलीला कळविण्यात आल्याचे आज परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने इटलीच्या येथील राजदूतांना भारत सोडून जाण्यास मनाई केलेली आहे. पुढील सुनावणीसाठी दोन एप्रिल ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.
इटलीच्या दोन खलाशांना भारतात पाठविण्यास नकार दिल्यानंतर भारत सरकारने उचललेल्या विविध राजनैतिक पावलांबाबत इटलीने 14 मार्चला रोममधील भारतीय राजनैतिक प्रतिनिधीला एक संक्षिप्त व बिनसहीचे निवेदन दिले. यात इटलीच्या राजदूतांना भारत सोडण्यास मनाई करण्यासंदर्भात व्हिएन्ना करारातील तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यावर भारत सरकारने इटलीला दिलेल्या उत्तरात व्हिएन्ना करारातील तरतुदींबाबत भारत सरकारला पूर्ण माहिती आहे; परंतु भारतातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे बंधनही भारत सरकारवर आहे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. याचाच अर्थ भारत सरकारने इटलीच्या राजदूतांना भारत सोडून जाण्यास केलेल्या न्यायालयीन मनाई हुकमाची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दोन एप्रिल ही पुढील तारीख निश्‍चित केल्याने त्यामधील फलनिष्पत्तीच्या प्रतीक्षेत भारत सरकार असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने आज इटलीच्या राजदूतांच्या आचरणावर भरपूर ताशेरे ओढले. "न्यायालयाला सादर केलेल्या हमीपत्राबाबत इटलीचे राजदूत अशा रीतीने रंग बदलतील यावर न्यायालयाचा विश्‍वास बसला नाही,' अशा शब्दांत इटलीच्या राजदूतांची निर्भर्त्सना करण्यात आली. त्याचबरोबर तुम्ही राजनैतिक पातळीवरील संरक्षणाची अपेक्षा करू शकत नाही, असेही न्यायालयाने त्यांच्या वकिलांना सुनावले. न्यायालय राजदूतांच्या शब्दावर विश्‍वास ठेवू शकणार नाही, असेही सांगण्यात आले.
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: