Last Update:
 
देश-विदेश

एम. करुणानिधी भूमिकेवर ठाम
प्रतिनिधी
Monday, March 18, 2013 AT 10:18 PM (IST)
Tags: -
चेन्नई, ता. 18 ः संयुक्त राष्ट्रांकडील श्रीलंकाविरोधी ठरावाच्या मुद्यावरून केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देणारे द्रमुकचे सर्वेसर्वा आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत. केंद्राकडून "डॅमेज कंट्रोल'चा भाग म्हणून पाठविण्यात आलेल्या तीन मंत्र्यांपुढेही करुणानिधी यांनी त्याचा पुनरुच्चार केला. केंद्राने आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे करुणानिधी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. तर करुणानिधी यांच्या
सूचना केंद्र सरकारपर्यंत पोचवल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दिली.
द्रमुकमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करुणानिधी या वेळी तमिळी नागरिकांच्या मुद्यावर गंभीर आहेत.
केंद्र सरकारला याची जाणीव झाल्याने "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांचे मन वळविण्यासाठी "ट्रबलशूटर' म्हणून अर्थमंत्री पी. चिदंबरम, संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना विशेष विमानाने येथे पाठविले. या तिन्ही मंत्र्यांनी सायंकाळच्या सुमाराला करुणानिधी यांची येथील "सीआयटी' कॉलनीतील निवासस्थानी भेट घेतली. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांच्यासह त्यांच्या सरकारमधील मंत्री व अधिकाऱ्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून घोषित करण्यासह प्रस्तावात विविध दुरुस्त्या करण्याच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. या तिघांशी झालेल्या चर्चेनंतरही करुणानिधी आपल्या भूमिकेवर ठाम
होते. दरम्यान, करुणानिधी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडणाऱ्या तिन्ही मंत्र्यांना द्रमुकच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटकही केली. 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: