Last Update:
 
देश-विदेश

कारगिल कारवाईचा मला अभिमान- मुशर्रफ
प्रतिनिधी
Wednesday, March 27, 2013 AT 11:58 PM (IST)इस्लामाबाद/कराची- प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्याने केलेल्या 1999 च्या कारगिल कारवाईचा आपल्याला अभिमान असल्याची दर्पोक्ती पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केली. कराचीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कारगिल युद्धातील सहभागाबाबत होणाऱ्या टीकेवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी ही दर्पोक्ती केली. या कारवाईच्या काळात मुशर्रफ लष्करप्रमुख होते. नंतर तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून ते सत्तेवर आले. "कारगिल कारवाई'चा मला अभिमान आहे, असे मुशर्रफ यांनी नमूद केले. चार वर्षांच्या स्वयंघोषित अज्ञातवासानंतर ते पाकिस्तानात आले आहेत. देश आणि देशवासीयांच्या हितासाठी आपण मायदेशी परतल्याचा दावा करून ते म्हणाले, की देश आणि देशातील नागरिकांचा विचार करणाऱ्यांपैकी मी एक आहे.

पाकिस्तानात येत्या 11 मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी "ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग' या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मुशर्रफ यांना त्यांच्या पक्षाला किती जागा मिळतील हे मात्र सांगता आले नाही. "मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट'बरोबर असलेल्या जुन्या संबंधांमुळे आपण कराचीतून विजयी होऊ, असे सांगून, कराचीच्या लष्करी भागातून निवडणूक लढविण्याचा आग्रह आपल्या समर्थकांनी केल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानचे हितसंबंध जपले गेल्याचे ते म्हणाले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: