Last Update:
 
देश-विदेश

स्वतंत्र 'तमीळ ईलम'साठी सार्वमत घ्या : तमिळनाडू
प्रतिनिधी
Wednesday, March 27, 2013 AT 11:59 PM (IST)चेन्नई - श्रीलंकेमधील तमीळ नागरिकांवरील अत्याचारामुळे भारतातील राजकारणही अधिक तापले असून आता स्वतंत्र तमीळ देशासाठी (ईलम) सार्वमत घ्यावे, असा प्रस्ताव आणण्याची मागणी तमिळनाडूच्या विधानसभेत मंजूर करण्यात आली आहे. देशाचे आंतरराष्ट्रीय धोरणच बदलण्याची मागणी करत तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीच हा ठराव विधानसभेत मांडला आणि तो एकमताने मंजूरही झाला. श्रीलंकेचा मित्रराष्ट्राचा दर्जाही भारताने काढून घ्यावा, अशी मागणीच विधानसभेत झाली आणि ती एकमताने मंजूर झाली.

"श्रीलंकेतील तमीळ नागरिकांचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडावा. सध्या श्रीलंकेत असणारे तमीळ आणि श्रीलंका सोडून इतरत्र गेलेल्या तमीळ नागरिकांमध्ये स्वतंत्र "तमीळ ईलम' स्थापन करण्याविषयी सार्वमत घेतले जावे,' असे या ठरावात नमूद करण्यात आले. श्रीलंकेतील वांशिक युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजेच 2009 च्या मे महिन्यात श्रीलंकेने तमीळ नागरिकांचा संहार केला, असा आरोप करून जयललिता यांनी या देशाला मित्रराष्ट्राचा दर्जा देणे बंद करावे, अशी मागणीही केली. या वांशिक संहाराची आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र चौकशीही करावी आणि त्यात दोषी आढळणाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी जयललिता यांनी केली. शिवाय, तमीळ नागरिकांवरील अत्याचार बंद करण्यासाठी श्रीलंकेवर आर्थिक निर्बंधही लादले जावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: