Last Update:
 
देश-विदेश

आणखी एकाला माफ करा : काटजूंची नवी मागणी
प्रतिनिधी
Thursday, March 28, 2013 AT 12:00 AM (IST)नवी दिल्ली - मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याची मागणी करून या विषयावरील वाद-विवादांना तोंड फोडणारे प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी आता याच खटल्यातील दोषी झैबुनिसा काझी या महिलेची बाजू घेतली आहे. काझी हिलाही न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा माफ केली जावी, अशी विनंती काटजू आता राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे करणार आहेत.

काटजू यांनी त्यांच्या "ब्लॉग'मध्ये यावर मतप्रदर्शन केले आहे. "मानवतेच्या दृष्टिकोनातून 70 वर्षीय झैबुनिसा हिची शिक्षा माफ झाली पाहिजे. तिच्यावरील आरोपांची सखोल माहिती घेत असता, माझे असे मत झाले आहे, की झैबुनिसालाही माफी दिली गेली पाहिजे. संजय दत्त आणि झैबुनिसा यांना माफी देण्याची विनंती मी राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे करणार आहे,' असे काटजू यांनी त्यांच्या "ब्लॉग'मध्ये लिहिले आहे.

बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला गेल्या गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर काटजू यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी संजय दत्तची बाजू घेत त्याला माफ करण्याची मागणी केली आहे. या प्रयत्नांवर सामान्य जनतेची टीका होत असली, तरीही काटजू यांनी झैबुनिसा हिच्यासाठीही माफी मागण्याचे ठरविले आहे. झैबुनिसाला माफी देण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी विनंती तिची मुलगी शगुफ्ता हिने काटजूंना "ई-मेल'द्वारे केली होती. "माझी आई निरपराध आहे. अबू सालेम आणि मंझूर अहमद सय्यद अहमद यांनी खरेदी केलेल्या "एके 47' बंदूका, गोळ्या आणि हातबॉम्ब एका बॅगेमध्ये होते. ही बॅग ठेवून घेण्याचे झैबुनिसाने कबूल केले होते. पण त्या बॅगेत काय आहे, याची तिला कल्पना नव्हती,' असा दावा 40 वर्षीय शगुफ्ताने केला.

""जर माझी आई किंवा मी "सेलिब्रेटी' असते, तर आज संजय दत्तला जितका पाठिंबा मिळत आहे, तेवढा आम्हालाही मिळाला असता. केवळ मानवतेच्या निकषांवरच माफी द्यायची असेल, तर ती फक्त संजय दत्तलाच का? माझ्या आईला का माफी नाही?,'' असा प्रश्‍न शगुफ्ताने विचारला. काटजूंनीही आता शगुफ्ताची मागणी उचलून धरली आहे. ""काही बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगण्याचा एकच आरोप झैबुनिसावर सिद्ध झाला आहे. तिच्या घरातून एकही शस्त्र सापडले नाही, यात शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळे, माझ्या मते तिला संशयाचा फायदा तरी मिळायलाच हवा. झैबुनिसा ही विधवा आहे. काही वर्षांपूर्वी तिच्यावर किडनीची शस्त्रक्रियाही झाली होती आणि दर सहा महिन्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागते. तिला आता चालताही येत नाही. तुरुंगामध्ये ती जास्त काळ राहू शकेल, असे मला वाटत नाही. यामुळे तिला माफी मिळावी, असे मला वाटते,'' असे काटजू यांनी लिहिले आहे.

"अभ्यासानंतरच मागेन आरोपींसाठी माफी'
संजय दत्तला माफ करावे, अशी मागणी केल्याने काटजू यांच्यासह सर्वच राजकारण्यांवर कडाडून टीका होत आहे. त्याविषयीही काटजू यांनी "ब्लॉग'मध्ये मत व्यक्त केले आहे. "संजयला माफ केल्याने इतरही आरोपी माफीचा अर्ज दाखल करतील, असे काही जणांचे मत आहे. त्यावर माझे उत्तर असे आहे, की माझ्या निदर्शनास आलेले प्रत्येक प्रकरण मी पुन्हा तपासून पाहण्यास तयार आहे. पण त्या प्रकरणामध्ये खरोखरीच माफी मिळायला हवी, असे अभ्यासानंतर माझ्या लक्षात आले, तरच तशी मागणी मी करेन. "सेलिब्रेटी' आणि सामान्य नागरिकांमध्ये मी काहीही फरक करत नाही,' असे काटजू यांनी लिहिले आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: