Last Update:
 
देश-विदेश

मनमोहनसिंगांनी दाखविले आपले खरे रंग : भाजप
प्रतिनिधी
Saturday, March 30, 2013 AT 12:06 AM (IST)
Tags: -
नवी दिल्ली, ता. 29 ः पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदाही आपण तयार आहोत, असे संकेत देणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांनी होळीनंतर लगेचच आपले खरे रंग दाखविले, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाने टीकेची झोड उठविली आहे. एका निरुत्साही नेत्याची प्रतिमा असलेले मनमोहनसिंग यांच्यातील अतिमहत्त्वाकांक्षी राजकारणी यानिमित्ताने दिसला आहे, असे टीकास्त्र रविशंकर प्रसाद यांनी आज सोडले.
मनमोहनसिंगांचा गेल्या नऊ वर्षांचा भ्रष्टाचारात बरबटलेला कार्यकाल व यूपीए-1 व 2 चे शासन पाहता ते पुन्हा याच पदावर येणे या देशासाठी घातक ठरेल, अशी भूमिका भाजपने मांडली आहे. सन 2009 मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी डॉ. सिंग यांना लक्ष्य केले होते. मात्र, त्यांच्या लेखी कमजोर पंतप्रधान असणाऱ्या डॉ. सिंग यांच्याच कारभारावर देशाने मोहोर उमटविली होती.
रविशंकर प्रसाद म्हणाले, की डॉ. सिंग यांची पुन्हा पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा नकळतपणे उघड झाली. मात्र, स्वातंत्र्यानंतरच्या सर्वाधिक भ्रष्ट सरकारचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात जगात भारताची प्रतिमा मलीन झाली. चलनवाढ, भ्रष्टाचार, महागाई देऊन पुन्हा पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा अजब म्हणायला हवी. राहुल गांधी यांच्या संभाव्य पंतप्रदानपदासाठी कॉंग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या सामूहिक वृंदगानावरही डॉ. सिंग यांच्या ताज्या वक्तव्याने प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. मात्र, आता "यूपीए'ला देशाची जनताच विटली आहे. अनेक राज्यांत सिद्ध झालेले भाजपशासित सरकार दिल्लीच्या तख्तावर येणार, हेही निश्‍चित आहे, असेही प्रसाद म्हणाले.
----------------------
निर्णय अमेरिकेचाच
नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या आमंत्रणाबद्दल प्रसाद म्हणाले, की अमेरिकेत जाण्यासाठी मोदी कधीही उतावीळ नव्हते व नाहीत. मात्र, एकीकडे जगातील हुकूमशहांना आश्रय देणाऱ्या व पोसणाऱ्या अमेरिकेने लोकशाही मार्गाने सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या विकासाभिमुख व लोकप्रिय नेतृत्वाला आमंत्रण द्यायचे की नाही, याचा निर्णय त्या देशालाच करायचा आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: