Last Update:
 
देश-विदेश

ममतादीदींना आस "यूपीए'च्या प्रतिसादाची
प्रतिनिधी
Saturday, March 30, 2013 AT 12:05 AM (IST)
Tags: -
कोलकता, ता. 29 : श्रीलंकेतील तमीळ नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्यावरून संयुक्त पुरोगामी आघाडीतून (यूपीए) तमिळनाडूतील द्रमुक पक्ष बाहेर पडल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अल्पमतात असलेले सरकार वाचविण्यासाठी "यूपीए'कडून प्रतिसाद मिळण्याची त्यांना आस लागली आहे.
"तृणमूल'चे सरचिटणीस आणि माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी "यूपीए'ला पाठिंबा देण्यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षाध्यक्षा ममतादीदीच घेतील, असे सांगून डॉ. मनमोहनसिंग सरकारसाठी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत. मात्र, त्याच वेळी अल्पमतात असलेल्या "यूपीए' सरकारला सत्तेवर राहण्याचा काडीमात्र अधिकार नाही, अशीही आगपाखड केली. "यूपीए' सरकार स्थिर असून, आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर रॉय येथे बोलत होते.
"यूपीए'ने पाठिंब्याची मागणी केल्यास "तृणमूल' मदतीस धावून येणार काय, या प्रश्‍नावर थेट बोलण्याचे रॉय यांनी टाळले. याबाबत अंतिम निर्णय ममतादीदीच घेतील. या मुद्यावर मी बोलू शकणार नाही. तो पक्षाचा धोरणात्मक निर्णय असेल. असा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ ममतादीदींनाच आहे; परंतु लोकसभेत कॉंग्रेसप्रणीत "यूपीए' सरकार आकड्यांची गोळाबेरीज अधिक काळ करू शकणार नाही. या सरकारने सत्ता सोडणे अधिक योग्य ठरेल, असेही रॉय म्हणाले.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लोकसभेत 19 खासदार असलेल्या ममतादीदींनी "यूपीए' सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. यानंतर पेट्रोल, डिझेल व खत दरवाढ, मल्टिब्रॅण्ड क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी, विमा विधेयक अशा मुद्यांवर "तृणमूल'ने सातत्याने "यूपीए' सरकारवर टीका केली आहे. 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: