Last Update:
 
देश-विदेश

कॉंग्रेसच तिसऱ्या आघाडीचा आधार!
प्रतिनिधी
Saturday, March 30, 2013 AT 12:07 AM (IST)
Tags: -
नवी दिल्ली, ता. 29 ः देशात एच. डी. देवेगौडा यांच्यापासून आय. के. गुजराल व चंद्रशेखर यांच्यापर्यंतच्या तिसऱ्या आघाड्यांच्या सरकारांचा मुख्य आधार कॉंग्रेसच होता. आता तर तिसरी आघाडी हा शब्दच इतिहासजमा झाला आहे. यांचे सरकार कसे येणार? असा भाजपचा ताजा सवाल आहे.
एका भाजप नेता म्हणाला, की या देशात तिसऱ्या आघाड्यांच्या झालेल्या प्रत्येक प्रयोगावेळी भाजपला "राजकीयदृष्ट्या अस्पृश्‍य' ठरवून आलेली ही सरकारे कॉंग्रेसच्याच टेकूवर उभी होती. धर्मनिरपेक्षतेच्या रखवालदारांनो एक व्हा, लाठ्या-काठ्या सांभाळा आणि भाजपविरुद्ध लढा, या अटलबिहारी वाजपेयी यांच्या वचनाचा दाखला देऊन हा नेता म्हणाला, की देशाची परिस्थिती आता आमूलाग्र बदलली आहे. 1996-97 मधील भारत व आजचा भारत यात फरक आहे. देशाचे राजकारण आता द्विध्रुवीय झाले आहे. देशाची जनता भाजप आघाडी व कॉंग्रेस आघाडी या दोन्हींना वगळून तिसऱ्या कोणाच्या मागे जाईल हे संभवत नाही. मतदाराच्या मानसिकतेतील बदल समजून न घेता तिसऱ्या आघाडीच्या हाका देणे सुरू झाले आहे. यापूर्वीची दोन्ही यूपीए सरकारे वाचविणारे मुलायमसिंह यादव, हेच तिसऱ्या आघाडीबद्दल बोलत आहेत, हेच सर्वांत मोठे आश्‍चर्य आहे. कॉंग्रेस धोकेबाज आहे, कॉंग्रेस सीबीआयचा दुरुपयोग करते ही समज मुलायमसिंहांना नऊ वर्षांनी आली आहे, मग इतकी वर्षे भाजप जे सांगत होता ते तंतोतंत खरे नाही काय? असा सवाल त्यांनी केला.
मात्र, मुलायमसिंहांशी भाजपची प्रामाणिक सैद्धांतिक मतभिन्नता कायम आहे. 2014 नंतर ते भाजप आघाडीकडे किंवा भाजप आघाडी त्यांच्याकडे जाण्याची शक्‍यता नाही. भाकप नेते ए. बी. वर्धन यांनीही तिसऱ्या आघाडीचा पुरस्कार केला आहे, याकडे लक्ष वेधता हा नेता म्हणाला, की वर्धन यांच्या सरचिटणीसपदाच्या काळात भाकपची घसरण झाली. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून भाकप वेगाने हद्दपार झाल्याने वर्धन यांची मते किती गांभीर्याने घ्यावीत, असा उपोधिक सवालही त्यांनी केला.
केंद्रात यापूर्वी चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल यांची सरकारे कॉंग्रेसच्याच टेकूवर तगलेली होती. तिसऱ्या आघाडीचा हा पूर्वानुभव लक्षात घेता जनता त्यांच्यावर पुन्हा कशाला विश्‍वास टाकेल? ज्या प्रादेशिक पक्षांचे बळ वाढण्याची शक्‍यता आहे ते पक्षही भाजप किंवा कॉंग्रेस आघाडीशीच निवडणुकीनंतर येतील किंबहुना त्यांना अन्य पर्याय नसेल, असेही भाकीत या नेत्याने वर्तविले.

कॉंग्रेस अल्पमतात
कॉंग्रेसचे सध्याचे सरकार पूर्णपणे अल्पमतात आहे. यापुढे कोणाच्या तरी उपकारांवर टाचा घासत ते आणखी 9-10 महिने दिवस काढू शकते, असा टोला भाजपने लगावला आहे. मात्र, कॉंग्रेस लोकसभेच्या आखाड्यात उतरला की काय चमत्कार होतो याचा अनुभव घेतल्याने यूपीएविरुद्ध अविश्‍वास ठराव आणण्याची तयारी भाजप दाखवीत नाही.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: