Last Update:
 
देश-विदेश

काळ्या पैशांची मिळणार माहिती
प्रतिनिधी
Saturday, March 30, 2013 AT 12:05 AM (IST)
Tags: -
नवी दिल्ली, ता. 29 ः भारत आणि लिख्टेनस्टाइन यांनी करविषयक माहितीच्या देवाणघेवाणीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंडचा शेजारी असलेला लिख्टेन्स्टाइन हा देश "टॅक्‍सहॅवन' म्हणजेच अतिश्रीमंतांचे अतिरिक्त किंवा बेहिशोबी पैसे गुंतविण्याचे स्थान म्हणून ओळखला जातो. गेल्याच वर्षी लिख्टेस्टाइन बॅंकेने त्यांच्याकडील काही संशयित भारतीयांची यादी भारत सरकारकडे पाठविली होती.
लिख्टेन्स्टाइन या लहानशा देशात कररचना आणि पैसे गुंतविण्याबद्दलची अतिगोपनीयता या दोन प्रमुख कारणांमुळे बेहिशोबी पैसे ठेवले जातात. परंतु, अलीकडच्या काळात व विशेषतः दहशतवादी कारवाया आणि त्यासाठी मनिलॉंडरिंगच्या माध्यमातून पैसे पुरविण्याचे प्रकार सुरू झाल्यानंतर अशा पैशांच्या ठेवी ठेवणारे देश खडबडून जागे झाले. त्यांनी काळ्या पैशांबद्दल माहिती पुरविण्याची तयारी दाखविण्यास सुरवात केली. त्यानुसार भारतालाही काही जणांची माहिती मिळाली.
भारत आणि लिख्टेनस्टाइनमध्ये झालेल्या करारातील प्रमुख आठ कलमे अशी :
1) पारदर्शकता आणि माहितीच्या देवाणघेवाणीशी संबंधित आंतरराष्ट्रीय मापदंडांवर आधारित करार.
2) प्रशासनाला ग्राह्य असलेल्या माहितीची देवाणघेवाण अपेक्षित; संबंधित देशातील कायद्यानुसार कारवाई योग्य असणे आवश्‍यक.
3) एका देशाने मागणी केलेली करविषयक माहिती आवश्‍यक नसली तरी देण्याची जबाबदारी संबंधित दुसऱ्या देशावर बंधनकारक.
4) बॅंकिंग व मालकीविषयक माहिती पुरविण्याची स्पष्ट तरतूद.
5) माहितीसाठी विनंती करणाऱ्या देशाच्या अधिकृत अधिकाऱ्यांना माहिती पुरविणाऱ्या देशात जाऊन तेथील दस्तऐवज, नोंदी तपासण्याची तसेच संबंधित व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची मुभा.
6) मिळविलेल्या माहितीची गोपनीयता सुरक्षित राखणे बंधनकारक. माहिती केवळ अधिकृत अशा करविषयक संस्था व विशिष्ट अशा अधिकाऱ्यांनाच देता येऊ शकेल. अर्थात, माहिती पुरविणारी संस्था किंवा संबंधित देशाच्या परवानगीने या माहितीच्या उपयोगाबद्दल परवानगी मिळविता येऊ शकेल.
7) 1 एप्रिल 2013 पासून कराराची अंमलबजावणी.
8) गेल्या वर्षांची माहिती मिळविणे शक्‍य; मात्र त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: