Last Update:
 
देश-विदेश

कॉंग्रेस बेईमान, पण पाठिंबा कायम - मुलायमसिंह
प्रतिनिधी
Saturday, March 30, 2013 AT 12:09 AM (IST)

नवी दिल्ली / लखनौ - गेला आठवडाभर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार (यूपीए) आणि कॉंग्रेसच्या विरोधात गरळ ओकणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आज "बॅकफूट'वर गेले. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम्‌ यांनी उत्तर प्रदेश सरकारला विकासकामांसाठी हवी ती मदत देण्याची तयारी दर्शविल्यानंतर यादव यांचा "सूर' बदलला. "यूपीए'चा पाठिंबा काढून घेण्याचा सध्या विचार नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले; मात्र कॉंग्रेस बेईमान असल्याची टीका करीत दुसऱ्या बाजूनेही ढोल बडविला.

यादव म्हणाले, 'कॉंग्रेस नेहमीच दबाव टाकून पाठिंबा मिळवते. संकटकाळात "यूपीए' सरकारला वाचविण्यासाठी कॉंग्रेसने नेहमीच माझा वापर केला, पण त्यांनी माझ्याच दारात "सीबीआय' उभी केली. द्रमुकने त्यांना पाठिंबा दिला. मात्र, त्यांनी त्यांच्या मंत्र्याला गैरव्यवहारात मुख्य आरोपी ठरवत कारागृहात पाठविले. कॉंग्रेस नेहमीच पाठिंबा देणाऱ्यांची फसवणूक करते.''

समाजवादी पक्ष सरकारचा पाठिंबा मागे घेऊ शकतो; मात्र सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चित पूर्ण करेल, असा विश्‍वास पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी काल (गुरुवार) व्यक्‍त केला होता. "ब्रिक्‍स' देशांच्या परिषदेहून परतल्यानंतर पंतप्रधानांनी पत्रकारांशी बातचीत केली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी मुलायमसिंह यादव यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.

ते म्हणाले, 'आघाडीमध्ये अजून कटुता आलेली नाही. मला माहीत नाही पंतप्रधानांनी असे वक्तव्य कोणत्या आधारावर केले. "यूपीए' सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासंदर्भात पक्षामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे समाजवादी पक्ष पाठिंबा मागे घेण्याची तूर्तास शक्‍यता नाही. सरकारच्या कार्यकाळाचे केवळ आठ-नऊ महिने शिल्लक असताना सरकार पाडण्यात काहीच अर्थ नाही.'' एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुलायम यांनी हा खुलासा केला. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नसल्याचे सांगून यादव म्हणाले, 'गुजरातमध्ये खरंच असे विकासाचे कार्यक्रम होत आहेत का? उत्तर प्रदेशसारख्या राज्यातही अशी अनेक विकासकामे होत आहेत, मात्र त्याकडे सगळ्यांची सोयीस्कर डोळेझाक सुरू आहे.''

पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भाजपने सावध प्रतिक्रिया दिली आहे. जर सरकारचे संख्याबळ आणखी घटले, तर मुदतपूर्व निवडणुका अटळ आहेत, असे भाजपने म्हटले आहे. समाजवादी पक्ष सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्‍यता संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी फेटाळून लावली आहे.

भाजपची युती नाही - यादव
गेल्या आठवड्यात जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलायमसिंह यादव यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यापार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुकीत भाजपशी युती करणार का, असा प्रश्‍न यादव यांना विचारण्यात आला. त्यावर भाजपशी युतीची शक्‍यता आम्ही फेटाळून लावली, असे ते म्हणाले.

वर्मा यांचा समाचार
केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांचा आज मुलायमसिंह यादव यांनी समाचार घेतला. यादव म्हणाले, ""राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याचा निर्णय कॉंग्रेसचा असेल, पण राहुल यांना पंतप्रधान बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बेनीप्रसाद वर्मा यांना विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाचे "डिपॉझिट' वाचविता आले नाही.''

तिसरी आघाडी जरूर उभी राहील. अशा आघाड्या देशातील परिस्थितीनुसार उभ्या राहतात. 2014 च्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचाच पंतप्रधान होईल. मात्र, मी देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीच पाहिले नाही आणि पाहतही नाही.
- मुलायमसिंह यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

 
आता माघार नाही - करुणानिधी
चेन्नई - श्रीलंकेतील तमीळ नागरिकांवरील अत्याचाराच्या मुद्‌द्‌यावरून "यूपीए'शी काडीमोड केलेल्या "द्रमुक'ने निर्णयात कोणताही बदल करणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारमधून बाहेर पडल्यानंतरही "द्रमुक'चे "यूपीए'शी संबंध कायम असून वेळप्रसंगी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. "द्रमुक'चे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी ही चर्चा खोडसाळपणा असल्याचे सांगत पाठिंब्याबाबतच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगापुढे अमेरिका मांडत असलेल्या ठरावात दुरुस्त्या करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: