Last Update:
 
क्रीडा

महिला स्पोर्टस्‌ क्‍लबला सौदीमध्ये परवानगी
प्रतिनिधी
Monday, April 01, 2013 AT 12:14 AM (IST)
Tags: -
रियाध, ता. 31 ः सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच महिलांच्या स्पोर्टस्‌ क्‍लबला परवाना देण्यात आल्याचे वृत्त आहे. धार्मिक पगडा असलेल्या सौदी अरेबियामध्ये हा निर्णय महत्त्वाचे पाऊल मानले जाते. आतापर्यंत महिलांच्या व्यायामाची ठिकाणे, जिम यांना "आरोग्य केंद्र' या नावाखाली आरोग्य मंत्रालयाचा परवाना घेणे आवश्‍यक होते. अंतर्गत मंत्रालयाने सध्याच्या यंत्रणेतील कमतरतांचा अभ्यास करून महिलांच्या स्पोर्टस्‌ क्‍लबला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त "अल-वतन' या वृत्तपत्राने काल प्रसिद्ध केले आहे. महिलांच्या स्पोर्टस्‌ क्‍लबसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारने समिती नेमल्याचे वृत्त गेल्या वर्षी एप्रिलमध्ये "अल-वतन'ने दिले होते.

कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी महिलेला तिच्या पुरुष नातेवाइकाकडून परवानगी घेण्याचे बंधन सौदी अरेबियात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या मागणीनंतर सौदी अरेबियाने गेल्या वर्षी ऑलिंपिकमध्ये महिला खेळाडूंना पाठविले होते. सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्यास बंदी आहे. लग्न, परदेश प्रवास, बॅंकेत खाते उघडणे, नोकरी या संदर्भात निर्णय घेताना सौदी महिलेला वडील, पती किंवा भाऊ या पुरुष नातेवाइकांची परवानगी घ्यावी लागते.

जानेवारीमध्ये सौदीचे राजे अब्दुल्ला यांनी "शुरा कौन्सिल'वर 30 महिलांचे नामनिर्देशन केले होते. "शुरा कौन्सिल' भविष्यातील कायदेनिर्मितीसंदर्भात चर्चा करते, तसेच सरकारला सल्ला देण्याचे काम करते. मात्र, महिलांसंदर्भात घेतलेल्या पुरोगामी निर्णयांवरून राजे अब्दुल्ला यांना धार्मिक नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: