Last Update:
 
क्रीडा

गुजरातने मुश्‍ताक अली करंडक पटकाविला
प्रतिनिधी
Monday, April 01, 2013 AT 12:16 AM (IST)

इंदूर - गोलंदाजांच्या भरावी कामगिरीच्या जोरावर गुजरातने टी-20 क्रिकेट स्पर्धा जिंकून सईद मुश्‍ताक अली करंडक पटकाविला. अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी पंजाबचा सहा गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबला गुजरातच्या मेहुल पटेल, जसप्रीत बुमराह आणि रोहित दहिया यांच्या गोलंदाजीसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आले. पंजाबची स्थिती एकवेळ 4 बाद 20 अशी होती. चंदन मदन आणि अमितोझसिंग यांनी पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केल्याने त्यांचा डाव स्थिर झाला. मदन बाद झाल्यावर अमितोझने गुरिंदरसिंगला साथीला घेत सहाव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. या दोन भागीदाऱ्यांमुळेच पंजाबला शंभरी पार करता आली. अमितोझने सर्वाधिक 49 धावा केल्या. पंजाबने 8 बाद 122 धावांची मजल मारली. गुजरातकडून बुमराहने 14 धावांत 3 गडी बाद केले. मेहुलने त्याला सुरेख साथ देताना 26 धावांत 2 गडी बाद केले.

गुजरातची सुरवातदेखील खराब झाली. कर्णधार पार्थिव पटेल (2) लवकर बाद झाला; पण त्यानंतर असद पठाण आणि नीरज पटेल यांनी 50 धावांची भागीदारी करून डाव सावरला; पण धावफलकावर 52 धावा लागल्या असताना दोघेही बाद झाले. त्यानंतर मनप्रीत जुनेजा आणि अब्दुलाहाद मलिक यांनी 64 धावा जोडताना आवश्‍यक धावांची गती राखली. शेवटी मलिक आणि अक्षर पटेल यांनी 18व्या षटकांत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक :
पंजाब 8 बाद 122
(अमितोझ सिंग 49, बुमराह 3-14, मेहुल पटेल 2-26) पराभूत वि. गुजरात 18 षटकांत 4 बाद 128 (असद पठाण 32, राजविंदर सिंग 2-40).


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: