Last Update:
 
देश-विदेश

खाणी सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न - पंतप्रधान
प्रतिनिधी
Wednesday, May 08, 2013 AT 12:09 AM (IST)
Tags: goa,   gomantak
पणजी, ता. 7 - गोव्यातील खाणकाम सुरू करण्यासाठी शक्‍य ते सारे प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज नवी दिल्ली येथे गोवा खाण लोकांचा मंचच्या शिष्टमंडळाला दिले. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज खाणी सुरू होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, यासाठी पंतप्रधानांची संसद भवनात सकाळी 11.30 वाजता भेट घेतली. या भेटीदरम्यान हे आश्‍वासन दिल्याची माहिती मंचाने येथे पत्रकातून दिली आहे.
पंतप्रधानांनी पुढे सांगितले, की पर्यावरणीय धोक्‍यांना प्रामाणिकपणे तोंड देताना गरिबी सर्वाधिक प्रदूषणकारी, भीषण आहे याची आठवण सर्वांनी ठेवावी.
गोव्यात गेले आठ महिने खाणी बंद झाल्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची सविस्तर माहिती "खाण लोकांचो मंच'च्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांना दिली. या शिष्टमंडळात मंचचे निमंत्रक सुहास नाईक, ख्रिस्तोफर फोन्सेका, अतुल जाधव, प्रकाश राऊत देसाई, सत्यवान गावकर, प्रमोद गाड, सुरेश देसाई, शांबा गावस, गीताली नाईक, प्रमिला घाडी इत्यादींचा समावेश होता. पंतप्रधानांना दिलेल्या सविस्तर निवेदन गोव्यात खाणी बंद झाल्यामुळे 30 टक्के लोकसंख्येवर परिणाम झाला असून चार लाख अवलंबितांचा त्यांत समावेश असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून योग्य मान्यता घेऊन केंद्र सरकारने सातत्याने व तातडीने खाणी सुरू करण्याची हमी द्यावी, अशी मुख्य मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी "लोकमंच'चे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व गोव्यातील खाणीवरील अवलंबिताना सध्या ज्या यातना भोगाव्या लागत आहेत त्याबद्दल सरकारला सहानुभूती असल्याचे स्पष्ट केले. गोव्यातील खाणकाम लवकर सुरू व्हावे यासाठी सर्व प्रयत्न करू, असे आश्‍वासनही पंतप्रधानांनी दिले असल्याची माहिती आयटकचे उपसरचिटणीस आर. डी. मंगेशकर यांनी प्रसृत केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
दिवसभरात नवी दिल्लीत केंद्रीय खाणमंत्री दिनशॉ पटेल यांचीही भेट घेऊन मंचने त्यांना निवेदन दिले. गोव्यातील खाणी लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करून राज्याला आर्थिक नुकसानी व मानव हानीपासून वाचविण्याचे आवाहन त्यांनी दिले असल्याची माहिती श्री. मंगेशकर यांनी दिली आहे.
मंचचे शिष्टमंडळ गेले तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून असून वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते, खासदारांना भेटून गोव्यातील खाण कामकाज शिस्तीने सुरू व्हावे यासाठी पाठिंबा, सहकार्य मागितले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: