Last Update:
 
क्रीडा

चर्चिल ब्रदर्स भारताचा "चॅंपियन क्‍लब'
प्रतिनिधी
Wednesday, May 08, 2013 AT 03:00 AM (IST)
Tags: goa,   gomantak
पणजी, ता. 7 - सामना संपण्यास 18 मिनिटे बाकी असताना भारताचा राष्ट्रीय कर्णधार सुनील छेत्री याने केलेला गोल गोव्याच्या चर्चिल ब्रदर्ससाठी मंगळवारी संध्याकाळी मौल्यवान ठरला. या गोलच्या बळावर त्यांनी कोलकत्याच्या मोहन बागानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. बरोबरीच्या एका गुणामुळे स्पर्धेची एक फेरी बाकी असताना चर्चिल ब्रदर्सचे सहाव्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद निश्‍चित झाले. दुसऱ्यांदा दक्षिण गोव्यातील हा संघ भारताचा "चॅंपियन क्‍लब' बनला.
चर्चिल ब्रदर्सने यापूर्वी 2008-09 मध्ये आय-लीग स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे, आय-लीग स्पर्धा सुरू झाल्यानंतर सहाव्यांदा गोव्याचा संघ राष्ट्रीय विजेता ठरला आहे. धेंपो क्‍लबने तीनवेळा, चर्चिल ब्रदर्सने दोनवेळा, तर साळगावकर फुटबॉल क्‍लबने एकवेळ ही स्पर्धा जिंकली आहे. मारियान डायस (मुख्य प्रशिक्षक) व सुभाष भौमिक (तांत्रिक संचालक) या दुकलीचे मार्गदर्शन लाभणाऱ्या चर्चिल ब्रदर्सने आता पुढील मोसमातील एएफसी कप स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली आहे.

चाल सफल
वास्को येथील टिळक मैदानावर बाकी राहिलेल्या 13व्या फेरीतील या लढतीत मोहन बागानला 27व्या मिनिटाला सी. एस. सबीत याने स्वप्नवत सुरवात करून दिली. त्याने चर्चिल ब्रदर्सच्या बचावफळी आणि गोलरक्षक संदीप नंदीला गुंगारा देत कोलकत्याच्या संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर 72व्या मिनिटाला बिनीश बालन याच्या सुंदर क्रॉसपासवर छेत्रीने स्पर्धेतील आपला चौथा गोल करून चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या 64व्या मिनिटाला ब्राझीलियन रॉबर्टो मेंडिस सिल्वा "बेटो' याच्या जागी अफगाणिस्तानच्या बलाल अरेझोऊ याला मैदानात उतरविण्याची चर्चिल ब्रदर्स व्यवस्थापनाची चाल सफल ठरली. अफगाण संघाचा कर्णधार मैदानात उतरताच चर्चिल ब्रदर्सची आक्रमणे जास्त धारदार झाली आणि मोहन बागानच्या बचावफळीवर दबाव आला.

विजेतेपद पक्के
आजच्या बरोबरीने चर्चिल ब्रदर्सचे 25 सामन्यांतून 52 गुण झाले आहेत. त्यांचा शेवटचा सामना रविवारी (ता. 12) एअर इंडियाविरुद्ध पुण्यात होईल. हा सामना गमावला तरी त्यांच्या अग्रस्थानात फरक पडणार नाही. पुणे एफसी संघाने शेवटच्या सामन्यात पैलान ऍरोजला हरविले, तर त्यांचेही 52 गुण होतील. अशा परिस्थितीत साखळी फेरीतील निकाल लक्षात घेतला जातो. चर्चिल ब्रदर्सने साखळी फेरीतील दोन्ही लढतीत पुणे एफसीला अनुक्रमे 1-0 व 2-1 अशा फरकाने हरविले आहे. त्यामुळे शेवटचा सामना जिंकला तरी पुणे एफसीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागेल. मोहन बागानचे आता 25 लढतीतून 26 गुण झाले असून त्यांनी 10 क्रमांकापर्यंत प्रगती साधली आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: